चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला असून महायुतीने अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. खान्देशचा विचार केला असता याठिकाणीही महायुतीने मोठे यश मिळवले आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये महायुतीची लाट दिसून आली असून याठिकाणी माजी मंत्री, माजी खासदार यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. याचबाबत ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’चा हा स्पेशल रिपोर्ट.
20 पैकी 19 ठिकाणी महायुतीचा विजय –
खान्देशातील 20 जागांपैकी तब्बल 19 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर फक्त नवापूर येथे काँग्रेस उमेदवार शिरीष सुरुपसिंग नाईक यांचाही निसटता विजय झाला आहे. ते फक्त 1121 मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच धुळे जिल्ह्यात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. याठिकाणी महायुतीमध्ये भाजपच्या 11, शिंदेसेनेच्या 7 आणि अजित पवार गटाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
खान्देशात 4 जण पहिल्यांदाच आमदार –
खान्देशातील 4 उमेदवारांना पहिल्यांदाच आमदारकीचा मान मिळाला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोलचे अमोल पाटील, रावेर ग्रामीणचे अमोल जावळे, धुळे शहरचे अनुप अग्रवाल आणि धुळे ग्रामीणचे राम भदाणे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
खान्देशातील माजी मंत्री, माजी खासदार यांचाही पराभव –
या विधानसभा निवडणुकीमध्ये खान्देशातील माजी मंत्री गुलाबराव पाटील, डॉ. सतीश पाटील, तसेच माजी खासदार डॉ. हिना गावित, उन्मेश पाटील, ए. टी. नाना पाटील, माजी आमदार डॉ. के. सी. पाडवी, अनिल गोटे, दिलीप वाघ, फारूक शाह, शिरीष चौधरी तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी या सर्वांचा पराभव झाला आहे.