धुळे, 4 जुलै : धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील पळासनेर गावाजवळ ब्रेकफेल झाल्यामुळे कंटेनर हा एका हॉटेलमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यूू झाला असून इतर अनेक जण जखमी आहे.
नेमकं काय घडलं –
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्याने एक कंटेनर हॉटेलमध्ये घुसला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले आहे.
आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 14 चाकी कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने या कंटनेरने सुरुवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडविले. हा अपघात इतका भीषण होता की, त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये हा कंटेनर घुसून आरपार बाहेर पडला. या भीषण अपघातात हॉटेल परिसरात व हॉटेलमध्ये असलेल्या 9 जणांचा मृत्यू झाला. तर 27 जण जखमी झालेली आहेत. सिमेंट फॅक्टरीसाठी लागणारी खळी घेऊन जाणारे वाहन अनियंत्रित झाल्याने ते एका हॉटेलमध्ये घुसले आणि त्याठिकाणी ते पलटले.
यादरम्यान या वाहनाने 11 वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 27 जण जखमी आहेत. जखमींना धुळे आणि शिरपूर येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गाची वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे. तसेच या भीषण अपघातामध्ये मृतांमध्ये सर्वाधिक मजुरांचा समावेश आहे. या वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने घाटातुन उतरत असताना हॉटेलमध्ये जाऊन शिरला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.