नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि खासदार प्रियांका गांधी उपस्थित होते.
यावेळी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल यांच्यासह अनेक परदेशी पाहुण्यांनीही निगम बोध घाटावर पोहोचत माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कारापूर्वी मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. सुमारे तासभर याठिकाणी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनीही त्यांना अखेरचा निरोप दिला. यानंतर काँग्रेस मुख्यालयापासून निगम बोध घाटापर्यंत सुमारे 11 किलोमीटर लांबीची शेवटची मिरवणूक काढण्यात आली. या प्रवासात राहुल गांधी स्वतः सहभागी झाले होते.
काँग्रेस मुख्यालय ते निगम घाट –
काँग्रेस मुख्यालयापासून सुरू झालेला डॉ.मनमोहन सिंग यांचा शेवटचा प्रवास अकबर रोडवरून इंडिया गेटकडे निघाला. मग इंडिया गेटवरून टिळक मार्गे, आयटीओ लाल दिव्यापासून उजवीकडे वळले. जुन्या पोलिस मुख्यालयासमोरून जात रिंगरोडने डावीकडे घेऊन निगम बोध घाटावर पोहोचला.
तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही उपस्थित –
मनमोहन सिंग यांचे पार्थिव 28 डिसेंबरला सकाळी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसने काल दिली होती. त्यामुळे आज काँग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेस मुख्यालयात पोहोचले होते. आज सकाळीच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे देखील काँग्रेस मुख्यालयात पोहोचले होते. तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही लष्कराच्या प्रमुखांनीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.