आंतरवाली (जालना), 22 फेब्रुवारी : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीसाठी 10 टक्के आरक्षण दिले असतानाच मनोज जरांगे हे त्यांच्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे? –
मनोज जरांगे यांनी 3 मार्चला रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. ते म्हणाले की, 24 फेब्रुवारीपासून आपल्याला गावागावात रास्ता रोको करायचा आहे. पण 3 मार्चला आपल्याला सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी रास्ता रोको करायचा आहे. त्यासाठीची तयारी आतापासूनच करा. आपापल्या जिल्ह्यात ताकदीने रास्ता रोको आंदोलन करायचे आहे. 3 मार्च रोजी असा रास्ता रोको झाला पाहिजे की, भारतात असा रास्ता रोको कधीच झाला नसेल, असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.
अजय बारसकर यांच्यावर टीका –
अजय बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत ते पलटी मारतात असे सांगितले होते. दरम्यान, या टीकेला जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले. एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात बारसकर अडकला होता आणि ते प्रकरण सरकारकडून दाबले गेले. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझे प्रकरण उघड करु, अशी धमकी अजय बारसकर यांना देण्यात आल्याचा, आरोप मनोज जरांगे यांनी यावेळी केला. यावेळी जरांगे यांनी अजय बारसकरवर जोरदार टीका केली आहे.
सरकार, शिंदे साहेबांचा प्रवक्ता आणि बारसकरच्या पाठी जो कोणी बडा नेता आहे, त्यालाही मी सांगत आहे, तुम्ही याला साथ दिली तर याच्यामुळे तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.
हेही वाचा : हजारो शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून, काय आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या?