जालना, 23 जून : राज्य सरकारच्या शिष्ठमंडाळाने काल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची भेट घेत त्यांना लेखी आश्वासन दिले. यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले. दरम्यान, आज मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सगेसोयरेच्या अंलबजावणीची व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणे करा, अन्यथा विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल, अस जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? –
मनोज जरांगे यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, ते माध्यमांसोबत अधूनमधून संवाद साधत असतात. आज त्यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी जरांगे म्हणाले की, आम्हाला कायद्याचा आधार आहे. आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे, मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देणे गरजेचे असल्याचे जरांगे म्हणाले.
राज्य सरकारला मोठा इशारा –
सगेसोयरेच्या अंलबजावणीची व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणे करा, अन्यथा विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तुम्ही गुलालाचा अपमान करु नका. कोणाच्याही दबाबावाला बळी पडू नका असेही जरांगे पाटील म्हणाले. कुणबी म्हणून सरकारी नोंदी या मुस्लिम समाजाच्या देखील निघाल्या आहेत. त्यांच्या नोंदी सरकारी निघाल्या तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे. त्यांच्यावर देखील अन्याय झाला नाही पाहिजे, असेही ते म्हणाले.
आम्हाला राजकारणात उतरावे लागेल –
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, राजकारण हा आमचा मार्ग नसून आम्हाला राजकारणात जायचे नाही. पण आम्हाला जर आरक्षण दिले नाही तर राजकारणात उतरावे लागेल. आचारसंहितेच्या आधी आरक्षण द्या अन्यथा आम्ही कोणालाच आमचे समजणार नाही. ज्याच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही असेही जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा : आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट