लातूर : तुम्हाला तीन-चार वेळा मंत्रीपद काय मिळाले, तुमच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा गेली. पण जामनेरमध्ये मराठ्यांची 1 लाख 36 हजार मते आहेत हे तुमच्या एक लक्षात नाही, आम्ही तुम्हाच्याही धुऱ्या वर करू शकतो, या शब्दात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठावाड्याच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान काल त्यांची लातूर येथे जाहीर सभा जाहीर झाली. या सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लातूरच्या सभेतून कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धमकीवजा इशाराही दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील –
लातूरच्या सभेत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘गिरीश महाजन साहेब तुम्ही कितीही डाव टाका, मीसुद्धा आरक्षणातला आणि त्यातला बाप आहे आणि मराठ्याचा जातवान क्षत्रिय आहे. तुम्हाला तीन चार वेळा काय मंत्रीपद मिळाले, तुम्ही उड्या काय मारू लागले, तुमच्या डोक्यात हवा घुसली, मस्ती घुसली, त्या मंत्रीपदाची. पण तुम्हाला एक ध्यानात नाही, जामनेरमध्ये 1 लाख 36 हजार कुणबी मराठ्यांचे मतदान आहे. शेवटी हे मराठे आहेत, आम्ही. तुमच्यासुद्धा धुऱ्या वर करू करू शकतो, या शब्दात आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना धमकीवजा इशारा दिला.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आता अगदी 3 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण हे विविध मुद्द्यांवरुन तापायला सुरुवात झाली आहे. त्यात मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. त्यांनी सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 13 जुलैची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे आता सरकार नेमकं यावर कशा पद्धतीने तोडगा काढते, यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा