जळगाव : गेल्या काही दिवसात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी सावकारीतून पैशांचा तगादा आणि धमक्यांना कंटाळून जळगाव शहरातील एका तरुणाने आत्महत्या केली.
नेमकं काय घडलं –
मुकेश अर्जुन पाटील, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लवेश चव्हाण आणि यश चौधरी या दोघांच्या माध्यमातून माझ्या पतीचा वर्षभरापासून पैशांसाठी छळ केला जात होता. लवेश चव्हाण हा जीवे मारण्याची धमकी देत होता. या दोघांनी माझ्या पतीस आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, असा आरोप मृताच्या पत्नीने केला.
माझ्या पतीने त्यांच्याकडून आमच्या मुलाच्या दवाखान्यासाठी पैसे घेतले होते. 1 लाख 20 आम्ही घेतलेले होते, त्यातून 65 हजार परत केले गेले होते. पण तो 2 लाख 90 हजार रुपये मागत होता. 1 वर्षापासून तो आम्हाला धमक्या देत होता, तेव्हापासून आम्ही असंच जगत होतो, असेही मृताच्या पत्नीने सांगितले.
दरम्यान, जळगाव शहरातील चंदूअण्णा नगरमध्ये राहणाऱ्या मुकेश अर्जुन पाटील या तरुणाने खासगी सावकारीतून पैशांसाठीचा तगादा आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.