ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 24 डिसेंबर : पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कासमपुरा येथील विवाहित महिलेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. पूजा अतुल कोळी (वय 19 रा. कासमपुरा) मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला हरविल्याची तक्रार काल पिंपळगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. अशातच आज सदर महिलेचा कासमपुरा शिवारातील विहिरीतील पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं? –
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासमपुरा शिवारातील शेतातून पूजा कोळी ही महिला हरविल्याची तक्रार मयत महिलेचा पती अतुल गणेश कोळी यांनी पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला काल दिनांक 23 डिसेंबर रोजी दिली होती. यानंतर, मयत महिलेच्या नातेवाईकांनी गावात तसेच परिसरातील शेतात शोध घेतला असता कासमपुरात शिवारातील विहिरीत मयत महिला आढळली.
यानंतर नातेवाईकांनी तिला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सदर महिलेस तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही पाहा : jaykumar rawal : मंत्री जयकुमार रावल यांच्या सुवर्ण खान्देश लाईव्हला शुभेच्छा, Exclusive मुलाखत