चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 14 मार्च : भाजपने काल सायंकाळी आगामी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये रावेर लोकसभा मतदार संघासाठी रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. मात्र, रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्ये नाराजी नाट्यास सुरूवात झाली आहे. रावेर पाठोपाठ चोपडा तालुक्यात भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले असून शेकडो पदाधिकार्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पत्रात काय म्हटलंय? –
रावेरसह चोपडा तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले आहे. रावेर लोकसभेमध्ये चुकीचा उमेदवार दिल्याने सर्व सामान्य मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून येत्या काळात आम्ही भाजपचे काम करू शकत नाही तरी आम्ही आमच्या पदाचा राजीनाम देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
अमोल जावळेंना उमेदवारी न दिल्याने नाराजी? –
मागील काही दिवसापासून रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसेंचे तिकीट कापून स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव तथा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. दरम्यान, भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा संधी दिली. रक्षा खडसे यांचे तिकीट जाहीर झाल्याने रावेर लोकसभेतील भाजप इच्छुक एक गट नाराज झाला आहे.
हेही वाचा : “जीवनात पदे येतात आणि जातात. मात्र…..,” खासदारकीचे तिकिट कापल्यानंतर उन्मेष पाटील यांची पहिलीच प्रतिक्रिया