जळगाव, 13 नोव्हेंबर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मानसिक व शारीरिक आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यशाळा काल 12 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, तर प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व्य.प. सदस्य प्रा. पवित्रा पाटील, अधिसभा सदस्य वैशाली वराडे व संचालक प्रा. आशुतोष पाटील हे मंचावर उपस्थित होते.
पोलिसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहणे – डॉ. महेश्वर रेड्डी
यावेळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, पोलीस दलाकडून समाजाला खूप अपेक्षा आहेत. पोलीस दलातील कर्मचारी सण-वार न पाहता सतत कर्तव्यावर हजर असतात व समाजाच्या सुरक्षेसाठी सज्ज असतात. ज्यावेळी समाज सण साजरे करत असतो त्यावेळी विशेषत: महिला पोलीसांना आपल कुटुंब व पालक म्हणून असलेली मुलांची जबाबदारी बाजूला सारून कर्तव्य करीत रहावे लागते. त्यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळांमधून त्यांना निश्चितच फायदा होईल, असे मत व्यक्त केले.
महिला कर्मचारी परिवार संभाळून समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतात – प्रा. डॉ. व्ही.एल. माहेश्वरी
अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठा विषयी थोडक्यात माहिती कथन केली. पोलीस दलातील महिला कर्मचारी परिवार संभाळून समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतात ही ह्या महिलांची गौरवांकित बाब आहे. त्यामूळे विद्यापीठाने पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचे करीता ही कार्यशाळा आयोजित केली आहे. सुरूवातीस प्रा. आशुतोष पाटील यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने सुरु असलेल्या कोर्सेस व उपक्रम यांची माहिती दिली व कार्यशाळा आयोजनाबाबतची भूमिका मांडली.
उद्घटनानंतर जळगावातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांनी ताण, तणाव व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, योग्य झोप, वेळेवर पाणी पिणे, जास्त योग्य बनण्याचा प्रयत्न न करणे, हसत खेळत काम करणे व भगिनी सारख्या व्यवहार करणारी व्यक्ती सोबत असायला पाहिजे.
यानंतरच्या सत्रात डॉ.गितांजली ठाकूर यांनी ब्रेस्ट कॅन्सर या कर्करोगावर काळजी व उपाययोजना या संदर्भात माहिती दिली. हा कर्करोग कसा ओळखावा याबाबतही विवेचन केले व प्रश्नांची उत्तरे दिली. यानंतर डॉ. प्रशांत सोमाणी यांनी उच्च रक्तदाब, मधुमेह व थायराईड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आहार कसा असावा, आजारांची लक्षणे कशी ओळखावी त्या करीता काय काळजी घ्यावी व कशा उपाययोजना असाव्यात याबाबत सविस्तर विवेंचन केले. त्यानंतर प्रा.लिना चौधरी यांनी महिला आरोग्य आणि योग अभ्यास या विषयावर सविस्तर माहिती देत योग अभ्यास कसा करावा याबाबत माहिती दिली.






