मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली, तेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी किती लाभार्थी होते, निवडणुकीनंतर सर्व निकष लावल्यानंतर किती लाभार्थी आहेत, किती लाभार्थी महिलांना अपात्र करण्यात आलं आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार की नाही?, असे प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंना विचारला. यावर बोलताना मंत्री अदिती तटकरेंनी सभागृहात याबाबत उत्तरे दिली.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये लाडक्या बहीण योजनेवरुन विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. आज विधानसभा सभागृहात ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्या प्रश्नावर बोलताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये प्रति महिना हप्ता कधी मिळणार या प्रश्नावर मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, ऑक्टोबर 2024 मध्ये आचारसंहितेच्या आधी लाभ वितरित करण्यात आला, त्या लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 33 लाख 64 हजार होती. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित झालेल्या लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 47 लाखपेक्षा जास्त आहे आणि 2100 रुपयांसंदर्भातील जो विषय आहे, महायुती सरकारने ही योजना आणली आहे.
महिलांना 1500 रुपये वितरित करणारं हे एकमेव सरकार आहे. यामुळे महिलांच्या आयुष्यात हा आनंद आहे, अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100 रुपयां संदर्भातील योग्य तो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही. ही दक्षता निश्चितपणे महायुतीचे सरकार घेईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभा सभागृहात सांगितले.
आम्ही ज्यावेळी ही योजना सुरू केली त्यावेळी अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्याठिकाणी यासंदर्भातील इन्सेन्टीव्ह देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आणि जवळपास 31 कोटींपेक्षा अधिक जी इन्सेटिव्हची रक्कम आहे, ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बालविकास अधिकारी त्यांच्याकडे जमाकडे केलेली आहे. आणि जवळपास 26 जिल्ह्यापेक्षा अधिक त्याठिकाणी जिल्ह्यांमधील अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या खात्यात जमा होण्याची सुरुवातही झालेली आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही मंत्री अदिती तटकरेंनी सभागृहात दिली.