मुंबई, 7 मार्च : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या हफ्त्यांची लाभार्थी महिलांकडून प्रतिक्षा केली जात आहे. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे 3000 हजार रूपये जमा केले जाणार आहेत. याबाबत मंत्री अदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली.
काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे –
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा, जो एकत्रित हप्ता 3 हजार रुपये आहे, हा आज थेट महिलांच्या खात्यात वितरित करत आहोत. दोन कोटी 52 लाख महिलांना हा लाभ आज टीडीबीडीच्या माध्यमातून आम्ही आज वितरित करत आहोत.
या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचं एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे.
नेमकी बातमी काय? –
महायुती सरकारकडून मागील वर्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना 1500 रूपये जमा करण्यात येतात. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे 3000 रूपये आज 7 मार्चपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली.
दोन महिन्यांचे पैसे जमा होणार –
महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पडताळणीला सुरूवात झाली. यामधून जवळपास 9 लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, लाडकी बहिण योजनेतून अपात्र करण्याचा आकडा वाढत जात असल्याने फेब्रुवारी महिन्याची रक्कम खात्यात जमा न झाल्यामुळे लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार किंवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
रक्कम वाढवून देण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल –
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचे आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही. दरम्यान, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देखील मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.
हेही वाचा – नार पार गिरणा प्रकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती