गडचिरोली, 1 सप्टेंबर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार असून सप्टेंबरमध्ये नोंदणी करणाऱ्या महिलांना दोन महिन्याचा लाभ मिळणार नाहीये. ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे त्यांना लाभ मिळणार आहे. याबाबतची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली दौऱ्यावर असताना दिली.
अदिती तटकरे काय म्हणाल्या? –
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे. मात्र, 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाहीये. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय.
मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र, ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळणार आहे. आतापर्यंत 70 ते 75 टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याचेही त्या म्हणाल्या.
‘त्या’ महिलांना मोठा दिलासा –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर पार पडला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली असून त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. दरम्यान, ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. त्या महिलांना पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ घेता आला नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा : राज्यात आजपासून मुसळधार पाऊस, या भागात ‘रेड अलर्ट’, जळगाव जिल्ह्याचा असा आहे हवामान अंदाज