जळगाव : ‘5 वर्षे चाळीसगावच्या जनतेने आमदार केले, तेव्हा आपण कुठे होते, 5 वर्ष खासदार असताना तुम्ही काय केले, पद गेल्यानंतर तुम्हाला जनतेची आठवण येत आहे, पण सत्ता असताना ना जळगावसाठी तुम्ही काही केले, ना चाळीसगाव मतदारसंघासाठी काही केले. हे सर्व आंदोलन दिखावा, थोतांड आहे’, या शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी माजी खासदार तसेच उद्धव सेनेचे नेते उन्मेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
खान्देशात नार पार गिरणा प्रकल्पावरुन राजकारण तापताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील कार्यक्रमात नार पार बाबत कॅबिनेटच्या बैठकीत टेंडर काढणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नार पार गिरणा प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र, केंद्रीय जल आयोगाने हा प्रकल्प नामंजूर केला होता. त्यामुळे राज्य सरकार धूळफेक करत आहे, अशी टीका उन्मेश पाटील यांनी केली. उन्मेश पाटील यांच्या या टिकेला मंत्री अनिल पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले मंत्री अनिल पाटील –
नार पार प्रकल्पासाठी उन्मेश पाटील यांनी गिरणा नदीत आंदोलनही केले होते. यावर मंत्री अनिल पाटील म्हणाले की, अनेक वर्षांचा प्रलंबित नार पार प्रकल्पाचा प्रश्न आज राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. टेंडरची प्रक्रिया लवकरात लवकर कशी पूर्ण होईल, असा निर्णयही कॅबिनेटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नार पारचा विषय हा उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता आणि राज्य सरकारने तो मार्गी लावला आहे, असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
आमदार, खासदार असताना तुम्ही काय केले?
केंद्रीय जल आयोगाने हा प्रकल्प नामंजूर केला होता. त्यामुळे राज्य सरकार धूळफेक करत आहे. माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या या आरोपांवर ते म्हणाले की, उन्मेश पाटील यांना नम्र विनंती आहे की, प्रत्येक निवडणूक आल्यावर आपली अशी अनेक आंदोलने पाहिली आहेत. 5 वर्षे चाळीसगावच्या जनतेने आमदार केले, तेव्हा आपण कुठे होते, 5 वर्ष खासदार असताना तुम्ही काय केले, पद गेल्यानंतर तुम्हाला जनतेची आठवण येत आहे, पण सत्ता असताना ना जळगावसाठी तुम्ही काही केले, ना चाळीसगाव मतदारसंघासाठी काही केले. हे सर्व आंदोलन दिखावा, थोतांड आहे, या शब्दात मंत्री अनिल पाटील यांनी उन्मेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
सिंधुदुर्गमधील वेदनादायी –
सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर ते म्हणाले की, विरोधकांकडे टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण मंत्री रवींद्र चव्हाण स्वत: त्या परिस्थितीकडे लक्ष ठेऊन आहेत. महाराजांच्या पुतळा कोसळणे म्हणजे प्रत्येकाच्या आत्म्याला दुखापत होण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे याप्रकरणी रवींद्र चव्हाण जातीने लक्ष देऊन आवश्यक ती पाऊले उचलत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा – नार पार गिरणा प्रकल्प : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?