मुंबई, 22 नोव्हेंबर : राज्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांची उभारणी वेगाने व्हावी यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अशा रुग्णालयांसाठी आवश्यक असलेली सरकारी जमीन महसूलमुक्त आणि सारा माफ करून पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून यासंबंधीचा शासन निर्णय महसूल विभागाने जारी केला आहे. या नियमामुळे राज्यातील आरोग्य सुविधा आणखी मजबूत होतील आणि कामगार वर्गाला जवळच्या ठिकाणी चांगला उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी मोफत –
या निर्णयाचा आधार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आधीच लागू केलेल्या मॉडेलवर ठेवण्यात आला आहे. जून 2025 मध्ये करोडी गावातील 15 एकर गायरान जमीन 200 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयासाठी मोफत देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. आता राज्यातील इतर जिल्ह्यांत जिथे ईएसआयसी रुग्णालयांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, तिथेही हाच नियम लागू केला जाईल. सरकारी जमीन उपलब्ध असेल, तर ती थेट विनामूल्य देण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
जमीन देण्याच्या प्रक्रियेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. मागणी केलेल्या जमिनीचे बाजारमूल्य एक कोटी रुपयांपर्यंत असेल तर संबंधित विभाग स्वतः निर्णय घेऊ शकतो. परंतु जमीन एक कोटींपेक्षा जास्त किमतीची असेल, तर ती देण्यासाठी वित्त विभागाची मंजुरी आवश्यक असेल. जमीन मोफत देण्यात आली तरी तिचा ताबा ‘भोगवटादार वर्ग-२’ या श्रेणीत राहणार आहे.
रुग्णालयाला किती जमीन मिळणार हे त्याच्या खाटांची क्षमता आणि उपलब्ध एफएसआयवर ठरेल. उदाहरणार्थ, 500 बेडचे रुग्णालय उभारण्यासाठी 8 ते 12 एकर, 300 बेडसाठी 6 ते 9 एकर, २०० बेडसाठी 5 ते 7 एकर आणि 100 बेडच्या रुग्णालयासाठी 3 ते 5 एकर जमीन देण्यात येणार आहे.
जमीन मोफत देण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, अनेक वेळा जमिनीची किंमत किंवा जमीन न मिळाल्यामुळे रुग्णालयांचे प्रकल्प अडकून बसतात. त्यामुळे कामगारांना त्यांच्या घराजवळच चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे कामगारांना उच्च दर्जाचे उपचार सहज उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : देशात 4 नवीन कामगार कायदे लागू; कर्मचाऱ्यांना नेमका फायदा काय?, जाणून घ्या एका क्लिकवर






