पुणे, 18 सप्टेंबर : महसूल विभाग लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू असून विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मागील सात महिन्यात या दिशेने उपयुक्त कामगिरी केली आहे. पाणंद रस्त्यांचे सीमांकन करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने केले आहे. पुणे जिल्ह्यातील आडाच्या वाडीने 15 पाणंद रस्ते तयार करून राज्याला मार्गदर्शक काम केले आहे. दरम्यान, येत्या काळात विविध योजनांचे एकत्रिकरण करून राज्यातील सर्व पाणंद रस्ते तयार करण्यात येतील, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित ‘सेवा पंधरवड्या’च्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? –
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, पुढील पाच वर्षात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा शासनाने निर्धार केला आहे. महसूल विभागात नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी शंभर कोटी रुपये देण्यात आले आहेत. महसूल अधिकाऱ्यांना नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महसूल विभाग सामान्य नागरिकांना त्यांचे हक्क देण्यासाठी गतिमानतेने काम करेल.
जमीनी परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले काढण्यासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता लागणार नाही. शेतकऱ्यांचे आपसातील वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना सुरू करण्यात आली. जिवंत सातबारा मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. पाणंद रस्त्यासाठी मुरुमासाठी कुठलेही स्वामित्व धन न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानंतर राज्यातील थांबलेले 50 लक्ष कुटुंबांचे दस्त पूर्ण होतील. आता राज्यात कुठल्याही भागातून इतर भागातील नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोठूनही दस्त नोंदणी करण्याचा नवा नियम केला. येत्या काळात संपूर्ण राज्यात कोठेही दस्त नोंदविता येईल असा नियम करू, असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, राज्याने एम- सँड धोरण स्वीकारले आहे. घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेला पुढील डिसेंबरपर्यंत स्वामित्व कार्ड देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी आभार मानले. पाणंद रस्ते खुले करण्याचे महत्त्वाचे काम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत होत आहे. यासोबत अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. महसूल विभाग सर्व योजना यशस्वीरितीने राबवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.