मुंबई, 15 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी 30 लाख घरकुले दिली असून या घरकुलांना मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे. असे असताना घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. घरकुल बांधकामासाठी आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार असून येत्या आठ दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदार जबाबदार असतील. तक्रार आल्यास अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले आहेत.
महसूलमंत्र्यांचे नेमके काय आदेश? –
वाळू धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात वित्त व नियोजन, मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार आशिष देशमुख, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. दरम्यान, घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी, असे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत दिले आहेत.
घरकुलासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार –
घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेता तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांची मदत घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व घरकुल लाभार्थींना घरपोच वाळू रॉयल्टीची पावती पोहच करणे आवश्यक आहे. यासोबत त्याची नोंदही ठेवण्यात यावी. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसोबत तर तहसिलदारांनी आमदारांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागणीनुसार वाळूची निर्गती करणे आवश्यक असल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले आहेत.
महसूल अधिकाऱ्यांच्या तक्रारी येता कामा नये-
राज्य विधिमंडाळाचे पावसाळी अधिवेशन हे जुन-जुलैमध्ये पार पडणार आहे. यामुळे महसूल संदर्भात यावेळी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात एकही तक्रार येता कामा नये. तसेच अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कुठेही चूक करता कामा नये. दरम्यान, तक्रार आली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज्य सरकारची कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी –
राज्य सरकारने कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी दिली असून प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलती देणार आहेत. एम-सँड तयार करणार्या युनिटला 200 रुपये प्रतिब्रास इतकी सवलत देणार असून यामुळे पर्यावरणाची हानी टळणार आहे.
हेही पाहा : भारत-पाक युद्ध थांबलं! भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं?; डॉ. सतीश ढगे यांची विशेष मुलाखत