मुंबई, 26 जानेवारी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. मराठा आऱक्षणाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान, राज्याचे कॅबीनेट मंत्री दीपक केसरकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले मंत्री केसरकर? –
राज्याचे कॅबीनेट मंत्री दीपक केसरकर यांनी मराठा आरक्षणाच्या मोर्चासंदर्भात माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मान्य झाल्या असून शासकीय विहित नियम असतात त्यानुसार अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र दिले होते. परंतु, आता आणखी देऊन 50 लाखांच्या वर ही संख्या जाणार आहे.
जरांगेंनी मान ठेवला पाहिजे –
ते पुढे म्हणाले की, कितीही अधिकारी भेटायला गेले अन् किती नेते भेटायला गेले, राज्य शासन हे राज्य शासन असते. सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून मनोज जरांगे यांनी मान ठेवला पाहिजे, त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना भेटून आनंद नक्कीच साजरा करतील, असे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया –
मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुढची चर्चा आपण करूयात. राज्य सरकारच्या शिष्टमंडळांना जीआरसाठी जी काय कागदपत्रे समोर ठेवली आहेत त्यात काय दुरुस्ती आहे, त्यात नेमक्या कोणत्या मागण्या मान्य होत आहेत, ते सगळ आपण चर्चा करून ठरवू. कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, सगळ्यांसमोर चर्चा करून निर्णय घेईल.
हेही वाचा : अनाथांचे नाथ शंकर बाबा पापळकर यांना पद्मश्री, ‘असा’ आहे त्यांचा जीवनपरिचय