चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जामनेर, 21 जून : जामनेरातील दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया भावनांना आवर घालावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जामनेर पोलीस स्टेशनवर केलेल्या दगडफेक प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी ट्विट करत हे आवाहन केले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील सहा वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत तिला ठार मारण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी फरार होता. दरम्यान, बालिकेवर अत्याचार आणि हत्या करण्यात आलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर ही संतप्त जमावाने कायदा हातात घेत पोलिसांवर दगडफेक करत तोडफोड केली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी ट्विट करत आवाहन केले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय? –
मंत्री गिरीश महाजन यांनी ट्विट करत म्हटलंय की, काल रात्री जामनेरात दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा असेच कुकृत्य संबंधित नराधमाने केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया भावनांना आवर घालावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्यावे. दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, या दृष्टीने काटेकोर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. संकटग्रस्त परिवाराला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याचीही सूचना मी प्रशासनाला केली आहे.
काय आहे प्रकरण? –
जामनेर तालुक्यात 11 जून रोजी एका सहा वर्षाच्या बालिकेचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. सदरच्या घटनेतील संशयित आरोपी सुभाष भील (वय 35, रा.चिंचखेडा) हा घटना उघडकीस आल्यापासूनच फरारच होता. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर, गुरूवारी तो भुसावळ शहरातील तापी नदीच्या परिसरात फिरताना दिसला असता स्थानिक गुन्हे शाखेसह भुसावळच्या पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेतले.