नाशिक, 26 जानेवारी : राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षांमधील नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका-टिपण्णी सुरू असताना मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तुम्हाला डोके असते तर एवढे लोक सोडून गेले असते का? असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांनी हल्ला चढवला आहे.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, तुम्हाला डोके असते तर एवढे लोक सोडून गेले असते का? त्यांच्या बडबड पोपटपंचीमुळे सगळे झाले आहे. त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा आहे, असेही महाजन म्हणाले. दरम्यान, देशामध्ये सर्व मतदारांनी मोदीजींना भाजपला आणि मित्र पक्षाला कौल दिला आहे. तुमचे काय राहिले आणि ते बघा 10-12 आमदार राहिले नाहीत, तुम्ही आमच्यावर काय टीका करता असा टोलाही मंत्री महाजन यांनी राऊतांना लगावला आहे. कुंभमेळ्याबाबत काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याबाबत बोलताना सांगितले की, कुंभमेळ्याच्या कामांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे असून आपण नाशिककर कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी, भक्तगणांच्या स्वागतासाठी सज्ज झालो पाहिजे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.