मुंबई, 1 ऑगस्ट : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) काय आहे? हे सर्व देशाला माहिती आहे. तुम्ही तुमची पात्रता ओळखून बोला, अशा शब्दात मंत्री महाजन यांनी राऊतांवर पलटवार केलाय.
मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? –
संजय राऊत यांनी संघावर टीका केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, संजय राऊत यांना उठता बसता देवेंद्र फडणवीस दिसतात. राऊत हे जाणीवपूर्वक फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. सूर्यावर थुंकले तर ते स्वत:च्या तोंडावर पडते. देवेंद्र फडणवीस हे पाच पाच वेळा निवडून आले असून राऊत तुम्ही साधे नगरसेवक म्हणून तरी निवडून आलात का? असा सवाल मंत्री महाजन यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) काय आहे? हे सर्व देशाला माहिती आहे. तुम्ही तुमची पात्रता ओळखून बोला. संघाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असेही मंत्री महाजन म्हणाले. तुम्ही आणि तुमचा मालक मागच्या दाराने निवडून आल्याची खोचक टीकाही मंत्री महाजन यांनी केली.
संजय राऊत काय म्हणाले होते? –
देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे असताना त्यांनी आजपर्यंत कोणती संस्कृती, कोणते नीतीनियम पाळले? मात्र, जे संघाला नीतिमान आणि प्रखर राष्ट्रवादी मानतात, त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देतो. माणूस किती क्रूर, भ्रष्ट आणि अनितीमान असतो, हे फडणवीस यांच्याकडे पाहून कळते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कपटी आणि कारस्थानी लोकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदनाम झाला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. दरम्यान, या टीकेवर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा : धक्कादायक! इमारतीवरुन उडी मारुन MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी?