जळगाव : इस्रायल एवढं राज्य हे फक्त जळगाव आणि धुळे इतकंच आहे. लोकसंख्या तितकीच आहे. पण आख्ख्या जगाला पुरुन उरतो. त्याचं कारण असं की, तिथल्या प्रत्येक वयोगटातील तरुण हा देशभक्तीने प्रेरित झालेला आहे. ज्वालामुखी आहे. त्यांच्या रगारगात देशाबद्दल प्रेम आहे. त्यामुळे इस्रायलसारख्या छोट्या देशाकडे अमेरिकेचीसुद्धा वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत होत नाही. पण आपल्याकडे जगातील सर्वात जास्त तरुणाई असतानाही ही व्यसनाकडे वाहत चालली आहे, हे आपलं दुर्दैव आहे, अशी खंत व्यक्त करत यापुढे कोणत्याही तरुणाने व्यसन करू नका, दारू पिऊ नका, व्यायाम करा, असा मोलाचा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी तरुणाईला दिला.
धुलिवंदनाच्या निमित्ताने फ्रेंड्स इव्हेंट संस्थेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी तरुणाईला मोलाचा सल्ला दिला.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन –
यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आपले सर्व सण साजरे करत असताना आपण धूम्रपान करू नका. कोणताही नशा करू नका. दारू पिऊ नका. अन्यथा उत्सव म्हटले म्हणजे, दारू पिण्यास आणखी एक कारण होतं की काय असं आजकाल वाटायला लागलंय. महापुरुषांच्या जयंती आपण साजरा करतो. बाबासाहेबांची जयंती साजरा करतो. शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतो. राम नवमी साजरी करतो आणि या कार्यक्रमात काय करतो तर दारू पिऊन, आचकट विचकट नाचायचं, धिंगाणा घालायचा. हे महापुरुषांना अपेक्षित नाही. आपल्या सणासुदीला अपेक्षित नाही.
सणांचा मनमुराद आनंद आपण लुटावा पण नशा न करता, दारू न पिता, अंमली पदार्थांचा वापर न करता लुटावा. अन्यथा आजकाल तरुणाईचा ओघ मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेकडे चालला आहे. त्यामुळे कुठल्याही सणावाराला नशा करू नका, अशी विनंती त्यांनी यावेळी तरुणाईला केली. ते पुढे म्हणाले की, जगातील सर्वात जास्त तरुणाई ही आपल्या देशात आहे. पण आपला तरुण अशा पद्धतीने नशा करत असेल, मद्यपान करत असेल, अंमली पदार्थांचं सेवन करत असेल, तर मग ही तरुणाई काय कामाची, असा सवालही त्यांनी केला.
जगातील सर्वात जास्त तरुणाई असतानाही…
इस्रायल एवढं राज्य हे फक्त जळगाव आणि धुळे इतकंच आहे. लोकसंख्या तितकीच आहे. पण आख्ख्या जगाला पुरुन उरतो. त्याचं कारण असं की, तिथल्या प्रत्येक वयोगटातील तरुण हा देशभक्तीने प्रेरित झालेला आहे. ज्वालामुखी आहे. त्यांच्या रगारगात देशाबद्दल प्रेम आहे. त्यामुळे इस्रायलसारख्या छोट्या देशाकडे अमेरिकेचीसुद्धा वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत होत नाही. पण आपल्याकडे जगातील सर्वात जास्त तरुणाई असतानाही ही व्यसनाकडे वाहत चालली आहे, हे आपलं दुर्दैव आहे.
म्हणून यापुढे कोणत्याही तरुणाने व्यसन करू नका, दारू पिऊ नका, आपली ताकद आहे, आपलं वय आहे, ते चांगल्या कामासाठी वापरा. व्यायामशाळेत जा, व्यायाम करा. चांगलं खा, चांगलं प्या. सकाळी धावायला जा. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील. हे पाहून माझा पोरगा कसा तरुणाबांड आहे, असं घरच्या लोकांनाही वाटेल. मैदानावर उतरला तर 10 पोरांना आवरला जात नाही. अन्यथा संध्याकाळ झाली की दारुच्या दुकानावर गेला, बारवर गेला की चार ठिकाणी डुकल्या खात पडतोय. घरचे लोक शोधायला फिरत आहेत. हे आपल्याला अपेक्षित नाही, असे मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले.