जळगाव, 23 ऑगस्ट : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात्रेकरूंना नेपाळमध्ये घेऊन जाणाऱ्या बसमधून 43 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 39 जण सापडले असून 4 जण बेपत्ता आहेत. तसेच त्यामध्ये नेपाळ आर्मीने 12 लोकांना एअरलिप्ट करून रूग्णालयात दाखल केलंय. दरम्यान, 18 जणांच्या तब्येतीबाबत अद्याप सांशकता असल्याने नेमका किती लोकांचा मृत्यू झालाय याबाबची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. याबाबतची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिलीय.
आमदार संजय सावकरे-अमोल जावळे नेपाळकडे रवाना –
मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, घटनास्थळी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिल्ली दूतावास तसेच नेपाळ सरकार, नेपाळ आर्मी आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बोलणे सुरू आहे. त्यांच्याकडून सतत माहिती घेतली जात आहे. यामुळे मृतांचा अधिकृत आकडा अजून समोर आलेला नाही. घटनास्थळी आपल्याकडून आमदार संजय सावकरे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे इंदोर आणि इंदोरहून विमानाने नेपाळकडे रवाना होणार आहे. आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतील.
नेमकं काय घडलं? –
नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना तानाहू जिल्ह्यात 400 फूट खोल दरीत बस कोसळल्याने या अपघातात बसचा चक्काचूर झालाय. जखमींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत किती जणांचा मृत्यू झालाय याबाबतची अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.
आमदार संजय सावकारे यांची माहिती –
भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यातून देवदर्शनासाठी भाविकांच्या दोन बसेस गेलेल्या होत्या. वाराणसी, अयोध्या याठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ते नेपाळला गेले होते. दरम्यान, त्या दोन बसेसपैकी एक बस 400 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये काही लोकं जखमी झाले असून काही जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्री रक्षा खडसे तसेच नेपाळ सरकारसोबत संपर्कात आहे. जशीजशी माहिती हाती येत आहे…तसेतसे ते माहिती पोहचवत आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव तळवेल, गाळेगाव मधील लोकं आहेत. नेपाळला जाण्यासाठी आमचे नियोजन सुरू असून आवश्यकता असली तर त्याठिकाणी लवकरात लवकर कसे पोहचता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे असल्याचे सावकारे यांनी सांगितलंय.
….तर अयोध्येत संजय सावकारे यांच्यासोबत झाली असती भेट –
आमदार संजय सावकारे यांनी सदर घटनेबाबतची माहिती देत असताना पुढे सांगितले की, 19 तारखेला आम्ही अयोध्येत पोहचलो तेव्हा हे भाविक त्याठिकाणाहून निघून गेले होते. आमचा संपर्कही त्यांच्यासोबत झाला होता. त्यांनी आम्ही तुमची वाट पाहत होतो, असेही सांगितले होते. मात्र, आम्ही त्याठिकाणी पोहचलो आणि ते निघून गेले. 20 ऑगस्टला दर्शन घेऊन आम्ही भुसावळकडे आलो आणि ते 19 ऑगस्टलाच रात्री निघून गेले होते. दरम्यान, हे भाविक अयोध्येत त्या रात्री थांबले असते तर आमदार संजय सावकारे यांच्यासोबत त्यांची भेट झाली असती असेही सांगितले जात आहे.
हेही वाचा : महिलेने महिन्याला मागितली 6 लाख रुपयांची पोटगी, कोर्टाने सुनावत म्हटले, ‘असे असेल तर तुम्हीच…’