मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. दरम्यान, यावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुंबईत माध्यमांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पोलीस दलात मनुष्यबळ कमी आहे. दिवसेंदिवस आता परिस्थिती बदलत आहे. यामुळे पोलीस भरती होण्याबाबतचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत आणि त्यांनी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत 15 हजार पोलीस पदभरती करण्याबाबतचा निर्णय घेतला असून युवकांना चांगल्या रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे.
View this post on Instagram
राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस शिपाई तसेच वाहनचालक आदी पदांची भरती केली जाणार आहे. यामुळे निश्चितच राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी याची त्याला मदत होईल, असेही मंत्री महाजन म्हणाले.
पोलीस भरती 2025 साठी किती पदे? –
राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – 10 हजार 908, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस् मॅन – 25, सशस्त्री पोलीस शिपाई – 2 हजार 393, कारागृह शिपाई – 554. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर –
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.