चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 22 सप्टेंबर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, या टीकेला मंत्री महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर देत खडसेंचा समाचार घेतला. नुसती पदे भोगायची आणि बडबड करत राहायची. आता ते उघडे पडले आहेत. पण पडल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन इतके बिघडले आहे की, ते काहीही बोलत आहेत. मात्र, मी जर बोललो तर त्यांना पडता मुश्किल होईल. मात्र, आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. पण त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. एक वेळ येईल की मी त्यांचा सगळा हिशेब चुकता करेन, असा इशारा मंत्री महाजन यांनी खडसेंना यावेळी दिला. ते जळगावात पत्रकारांसोबत बोलत होते.
एकनाथ खडसेंवर जोरदार टीकास्त्र –
गिरीश महाजन यांनी त्यांच्या मतदारसंघात विकास केला नसल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. यावर तुम्ही जर तुमच्या मतदारसंघात काम करता तर कोथळी ग्रामपंचायत तुमची आहे का?, मुक्ताईनगरची नगरपालिका तुमच्याकडे आहे का?, काय आहे तुमचं तुमच्या मतदारसंघात? त्यांनी त्यांचा मतदारसंघाचा विकास का केला नाही?. त्यांना लोकं का निवडून देत नाहीत?, असा प्रश्न करत स्वतःच्या मतदारसंघात खडसेंची बोंब पडली नसल्याची जोरदार टीका मंत्री महाजन यांनी केली.
मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास माझ्यावर –
स्वतःला मोठ्या नेता समजणाऱ्याची लाचारी इतकी झाली की, त्यांची मला कीव येत आहे. ते एकीकडे म्हणतात की मी भाजपचा प्रचार केला. दुसरीकडे म्हणतात मी राष्ट्रवादीत आहे. माजी मंत्री सतीश अण्णांनी त्यांना चांगलं सुनावलं. मुलगी आली की मुलीचे काम करायचं, सून आली की सूनेचे काम करायचं. म्हणजे इकडेही आमदार तिकडेही आमदार..याचा अर्थ की सर्व पद घरात ठेवायची. अशी भूमिका त्यांची त्याठिकाणी आहे. आणि हे सर्व लोकांना कळायला लागलंय. म्हणून त्यांनी कितीही बडबड केली तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत