चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 8 एप्रिल : माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करत स्वगृही परतणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी काल दिली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावरून प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन? –
मंत्री गिरीश महाजन माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, खडसे यांचा प्रवेश कधी होणार हे त्यांनाच माहीत आहे. खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी-अमित शाहांशी आहे. एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की, आमची काय भूमिका राहणार आहे? ते रोज दिल्लीला जाताय आणि येताय. रोज सांगताय झालय, आता त्यांनी सांगितले आहे की 15 दिवसांनी जमणार आहे, तर वाट बघू, असा खोचक टोली त्यांनी लगावला.
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, एकनाथजी खूप मोठे नेते असून त्यांचा पक्षप्रवेश माझ्यासारख्या छोट्या माणसाचे काम नाही. ते खूप मोठे नेते आहेत भाजपाचे, अर्थात होते. त्यांचा प्रवेश असा खाली होणार नाही, मुंबईत होणार नाही, असे ते म्हणतात. माझा प्रवेश दिल्लीत आहे. माझ्या सगळ्या ओळखी आहेत, असे ते म्हणतात. खडसे फार मोठे आहेत. त्यांच्याविषयी फार बोलणे संयुक्तिक नाही.
खडसेंचा पक्षप्रवेश दिल्लीत होणार –
माजी मंत्री एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असून त्यांचा पक्षप्रवेश सोहळा दिल्लीत होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती त्यांनी स्वतः माध्यमांसमोर दिली आहे. नाराजीमुळे मी पक्षातून बाहेर पडलो होतो आणि आता ही नाराज कमी झाली असल्याने मी माझ्या घरात परत येत आहे. मला वाटले की आता स्वगृही परतले पाहिजे. म्हणून मी भाजपात जात असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले.
हेही वाचा : ‘…म्हणून मी भाजपमध्ये जात आहे,’ एकनाथ खडसे यांनी सांगितले पक्षप्रवेशाचे नेमके कारण