ठाणे, 9 जून : मुंबईत कामाला जाणाऱ्याला रोज जीवघेण्या गर्दीत मृत्यूला हुलकावणी देत प्रवास करावा लागत असतो. अशातच आज सकाळी दुर्दैवी घटना घडली. कसऱ्याहून मुंबई सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी, आणि सीएसएमटीवरून कल्याणच्या दिशेनं जाणारी लोक एकमेकांना क्रॉस करत असताना हा अपघात घडला. यावेळी दोन्ही लोकलमध्ये दरवाज्यावर उभे असणारे प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि एकूण 13 प्रवासी लोकलमधून खाली पडले. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय येथे जाऊन जखमी रूग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. याप्रसंगी विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, धुळे शहरचे आमदार अनुप अग्रवाल तसेच रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे आदी उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी दिली महत्वाची माहिती –
जखमी रूग्णांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंब्य्राच्या अलिकडे वळणावर दोन लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना सदर अपघात घडला असून सदर घटना अतिशय दुर्दैवी आहे. मात्र हा अपघात नेमका कसा घडला याबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. तसेच या अपघातात दोन गंभीर रुग्ण असून त्यांना ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर सीटीस्कॅन आणि एमआरए झाले आहे. ज्या रुग्णांवर शस्रक्रिया करायची आहे, याबाबत मी माहिती घेत असून त्यांच्यावरही आज किंवा उद्या शस्रक्रिया केली जाईल आणि त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल. तसेच अपघातातील जवळपास 10 रुग्णांना कळवा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यातील जे 7 रुग्ण याठिकाणी आहे, ते फ्रॅक्चर आहेत. मात्र, ते आऊटऑफ डेंजर असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली आहे.
मृताच्या वारसांना 5 लाख रूपये मदत –
मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून अपघातात ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना मदत म्हणून सरकारने 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जखमींना 50 हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील आणि त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहितीही महाजन यांनी दिली.
View this post on Instagram
मुंब्रा रेल्वे अपघात घटना –
मुंब्रा – दिवा स्थानकांच्या दरम्यान आज 9 जून रोजी सकाळी सुमारे सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी लोकल ट्रेन अपघाताची दुर्घटना घडली. मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकांच्या दरम्यान गती वाढवलेल्या दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या जवळून जात होत्या. यावेळी फास्ट लोकल खचाखचून भरलेली होती अनेक प्रवासी दरवाजाला आधारून उभे होते आणि बॅगेसह पाठीत बसले होते. दुर्दैवाने, दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या ट्रेनने त्यांना घासल्याने अनेक प्रवासी खाली पडले. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून इतर जण गंभीरित्या जखमी झाले.