मुंबई, 3 जून : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विखारी शब्दात टीका करत “पक्ष फोडण्यासाठी नेमलेला दलाल म्हणजे गिरीश महाजन” असं म्हटलं होतं. दरम्यान, मंत्री महाजन यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मुंबईत माध्यमांसोबत मंत्री गिरीश महाजन संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शरद पवार तसेच काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसवलं असून त्यांनी यामध्ये जी दलाली केली ती आजपर्यंत कोणीच केली नाही. राऊतांनी ही राजकीय दलाली केल्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली असून आज उद्धव ठाकरेंकडे कोणीच शिल्लक नाहीये. जर त्यांना आज आवरलं नाही तर यांच्याकडे कोणीच राहणार नाही, असेही ते म्हणाले.
View this post on Instagram
राऊतांसारखं पक्षाला रसातळाला नेण्यासाठी दलाली करणार नाही –
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मी तर पक्षाचा पाईक आहे. मी कोण आहे काय आहे हे सर्वांना माहीतीये. गेल्या 35 वर्षांपासून 7 टर्मपासून निवडून येतोय. पक्षाच्या वाढीसाठी मी काहीही करेल. राऊतांसारखं पक्षाला रसातळाला नेण्यासाठी दलाली करणार नाही. दरम्यान, गोरेगावच्या पत्रचाळीत आपण काय केलं, कितीदिवस तुम्ही जेलमध्ये होतात, असा सवाल मंत्री महाजन यांनी राऊतांना केलाय.
राऊतांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार संपवले –
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला राऊतांनी काँग्रेसच्या मांडीवर बसवलं आणि सर्व शिवसेनाच त्यांनी संपवली. राऊतांची बडबड जर बंद झाली नाही तर उद्धव ठाकरेंचे देवच भल करो, असे मंत्री महाजन म्हणाले. राऊतांना शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना संपवायचे होते. यासाठी अपार मेहनत करत त्यांनी शिवसेनेला काँग्रेस तसेच शरद पवारांच्या दावणीला बांधली. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार संपवले असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय.
ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस हा गिरीश महाजन असेल, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. 35 वर्ष सलग मी भाजपमध्ये निवडून आलोय. माझ्या मनात कधी पक्षांतराचा विचार आलाच नाही. आमच्यासारखे कार्यकर्ते एका विचाराने प्रेरित झाले. सत्ता असो किंवा नसो आम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी 20 वर्ष विरोधात होतो. मलाही त्यावेळी अनेक आमिष दाखविण्यात आले. दरम्यान, यत्किचिंतही माझ्या विचारापासून दूर झालो नसून आता तर काही प्रश्नच येत नाही, अशा शब्दात राऊतांच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.