चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 1 डिसेंबर : पाचोऱ्यात झालेल्या विकासकामांवर आम्ही मत मागत असून विरोधकांचा मोठा पराभव होऊन नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात पार पडलेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत ते बोलत होते. दरम्यान, पाचोऱ्यातील कृष्णापुरी परिसर हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून याठिकाणी कधीही शिवसेनेचा पराभव झालेला नाहीये. यामुळे मजबूत असा हा शिवसेनाचा बालेकिल्ला असल्याने शिवसेनेला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, असे आवाहनही गुलाबराव पाटील उपस्थित जनतेला केले.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
मागच्या वेळेस संजय गोहील हे नगराध्यक्ष होते. तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सहकार्याने तसेच एकनाथ शिंदे नगरविकास विभागाचे मंत्री असल्याने मागच्या काही वर्षांत पाचोऱ्याचा विकास झाल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, जसे शरीर एका विचाराचे असले पाहिजे तसेच राज्य चालवणं सुद्धा एका विचाराचे असले पाहिजे. नगरविकास विभागाचे मंत्री शिवसेनेचे, पालकमंत्री शिवसेनेचे तसेच आमदार देखील शिवसेनेचे आहेत. आणि नगराध्यक्ष देखील जर शिवसेनेच्या झाल्या तर मोठ्या प्रमाणात विकास होईल, असेही ते म्हणाले.
“विरोधकांचं देखील काही खरं नाही” –
आम्ही माणसं जोडली असून प्रेमाने माणसं जिंकली आहेत. यामुळे तीन ते पाच वेळा आम्ही निवडून आलोय. आम्ही जनतेची कामे केली आणि या कामांच्या भरवश्यावर आम्हाला जनतेकडून मोठ्या प्रमाणात साथ मिळाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, लाडकी बहिण योजनेमुळे अनेक महिलांना मोठा लाभ झाला आहे. आधी महिला पुरूषांकडे पैसे मागयचे. मात्र, आता पुरूष महिलांकडे पैसे मागतात. मागच्या विधानसभा निवडणुकीत पुरूषांपेक्षा महिलांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ठ केले. विरोधकांचे देखील काही खरे नसल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
“….तोपर्यंत या किशोर आप्पाला कोणीही थांबवू शकत नाही!”
सध्या पाचोऱ्याचे नाव हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेत आहे. अनेक नेते पाचोऱ्यात येत असून विरोधकांकडून किशोर आप्पांना थांबविण्यासाठी प्रयत्न केला जातोय. मात्र, जोपर्यंत मतदारसंघातील तरूण, शेतकरी, सर्वसामान्य जनता तसेच लाडक्या बहिणी सोबत आहेत तोपर्यंत या किशोर आप्पाला कोणीही थांबवू शकत नाही. दरम्यान, मला तब्बल 40 हजार मताधिक्याने तिसऱ्यांदा आमदार म्हणून जनतेने निवडून दिले. यामध्ये तब्बल दहा हजार मताधिक्य पाचोरा शहरातून मिळाल्याचे आमदार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
“वर्षभराच्या आता पाणीप्रश्न सुटणार” –
पाचोरा शहराला सर्वत्र क्रॉकींटीकरण करून विविध घटकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. सध्यास्थितीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न असून 65 करोड रूपये पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. तसेच 350 कोटी रूपयांची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर होऊन येत्या वर्षभराच्या आत पाचोरा शहराचा प्रश्न सुटणार आहे. तसेच अतिक्रमित घरे नावावर लावण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 6 महिन्यांच्या आत ही आता हक्काची घरे नावावर होणार आहेत. दरम्यान, पाचोरा शहरात तीन महत्वाचे पूल उभारण्यात आले असून पुढील पावसाळाच्या आत नदीकाठच्या भागात संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
“शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा” –
पाचोरा शहरात विकास तसेच शांतता नांदत असून या शहराचे नाव जळगावच नव्हे तर आता राज्यात विकासाच्या दृष्टीने घेतले जात असल्याचे आमदार पाटील म्हणाले. जनतेने दिलेल्या प्रेमाच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली. दरम्यान, जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी कायम राहून द्या आणि येत्या 2 डिसेंबर रोजी धनुष्यबाण या चिन्हाचे बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी केले.
हेही वाचा : Video | Election Update : पाचोऱ्यात 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली; सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितलं कारण






