जळगाव, 9 ऑगस्ट : विधानसभा निवडणुक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर आली असताना जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्या जोरदार लढत रंगणार असल्याची शक्यता असताना गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभेत देवकरांनी आमचाचा प्रचार केला, असे म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीवरून गुलाबराव देवकर यांच्यावर निशाणा साधला. जळगावात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? –
मंगेश चव्हाण आणि गुलाबराव देवकर यांच्यात अनौपचारिक भेट झाली होती. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात काम करावे याकरिता देखील ते मंगेश चव्हाण यांची चहा पायला गेले होते. देवकर हे फक्त रक्षाताईंच्याच मतदारसंघात दिसले कारण त्यावेळी देखील त्यांचा गोडा चहा ते प्यायले होते. दरम्यान, देवकर हे जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी दिसले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे लोकसभेत आम्हालाच मदत केलीय.
ज्यादिवशी मतदान होते त्यादिवशी त्यांनी श्रीराम पाटलांचा जोरात प्रचार केला. असे असताना मंगेश दादांच्या दूध फेडरेशनचा चहा त्यांना खूप आवडतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला. दरम्यान, शिंदे सेनेने स्मिता वाघ यांचे काम केले. त्यांनी कसे वागावे, काय करावे हा त्यांचा विषय आहे. माझा वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे. निष्ठेने काम केले. महायुती पक्की राहील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया –
भाजपला मदत केल्याचा एक तरी पुरावा किंवा उदाहरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दाखवावे हे माझ्या संपूर्ण राजकीय जीवन थांबवतो, मी जर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मदत केली असेल तर गुलाबराव पाटलांनी हे सिद्ध करावे राजकारणातून संन्यास घेईल, अशी प्रतिक्रिया गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत दिली माहिती –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सुरू असून, जिल्ह्यातून प्राप्त ५ लाख 33 हजार अर्जापैकी 5 लाख 9 हजार पात्र ठरले आहेत. योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी जळगावला येणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळातील काही मंत्री उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीत काल आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या.
हेही वाचा : पुढच्या आठड्यात या दिवशी सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर; पाचोऱ्यालाही येणार, असे असेल नियोजन