जळगाव, 23 डिसेंबर : आता त्यांचे भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतदानाची शाई पण निघाली नाही, तोपर्यंतच देवकरांनी पक्ष बदलवायचा विचार सुरू केला. खरंतर, जो कार्यकर्ता रात्रंदिवस त्यांच्याकरिता मतदानाची मागणी करत होता. त्यांना न विचारता पक्षांतर करताएत. त्यांची केवढी गळचपी झाली असेल. मी आधीच सांगितले होते हे नकली गुलाबराव आहेत. खरा असली गुलाबराव इकडे असल्याचा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांना लगावला आहे. ते पाळधी येथे माध्यमांसोबत बोलत होते.
“…मी त्यांना सोडणार नाही” –
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, स्वतः चेअरमन असताना संस्थेच्या नावावर त्यांनी बँकेत पैसे खाल्ले आहेत. ती संस्था आज बंद आहे. मजूर फेडरेशनचे पैसे वापरता येत नाहीत. असे असतानाही त्यांनी सरळ 10 कोटी रुपये काढून घेतले. हे त्यांना माहितीए की आता गुलाबराव आता यामागे लागतील. यामुळे अजित दादांकडे गेले आणि तिथे नाही झाले म्हणून आता भाजपकडे जाताएत…आणि मग भाजपमध्ये गेल्यावर गिरीश भाऊ आहेत गुलाबभाऊला सांगायला. दरम्यान, मी त्यांना सोडणार नाही, असा इशाराही मंत्री पाटील यांनी देवकरांना दिला आहे.
कामांना वेगाने पूर्ण करण्याच्या प्रयत्न करणार –
जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतंर्गत कामे सुरू न करणाऱ्या मक्तेदारांना नोटिसा पाठवून काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच वेळेवर काम सुरु न केल्यास संबंधितांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात येतील असेही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात पुन्हा पाणीपुरवठा खाते मिळाल्यामुळे या मंत्रालयातंर्गत सुरु असलेल्या कामांना वेगाने पूर्ण करण्याच्या प्रयत्न राहणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.