चाळीसगाव, 29 जुलै : लाडकी बहिण योजनेवरून आमच्यावर बरेच लोकं टीका करत आहेत. मात्र, आम्ही बहिणांना सांगितले की, आम्ही तुम्हाला पैसै देत आहोत. मात्र, ते (विरोधक) म्हणतात की तुम्हाला पैसे देणार नाहीत. पण, तुमचे जर पैसे द्यायचे असतील तर मग आम्हाला पुन्हा निवडून द्यावे लागेल. कारण हे (विरोधक) तुम्हाला पैसे देणार नाहीत, असा टोला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना लगावला. चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभारल्या गेलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
लाडक्याच बहिणी आपल्याला निवडून देतील –
मंत्री गुलाबराव पाटील उद्घाटन सोहळ्यात पुढे म्हणाले की, पुढील दीड ते दोन महिन्यात राज्यात आचारसंहिता लागतेय. वातावरण पण चांगले आहे. पाऊसपण चांगला पडतोय. काळजी करू नका, लाडक्याच बहिणी आपल्याला निवडून देतील, असे त्यांनी सांगितले. लाडकी बहिण योजनेतील तुमचे जर पैसे द्यायचे असतील तर मग आम्हाला पुन्हा निवडून द्यावे लागेल. कारण हे तुम्हाला पैसे देणार नाहीत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. लोकसभेला महिलांनी दाखवून दिले आहे की, महिला कशापद्धतीने कामे करतात, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
चाळीसगावचे वैभव असलेली इमारत –
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर तहसीलदार यांना त्यांच्या कॅबीनमध्ये बसविले असता, ते मंत्रीच बसल्याचे वाटत होते. ही प्रशासकीय इमारत चाळीसगावचे वैभव असून त्या वास्तूला जपण्याचे काम नागरिकांनी करावे. एकाच वेळी 8 खात्यांचा समावेश असलेली इमारत अतिशय सुंदर आहे. म्हणून याठिकाणी येणाऱ्या लोकांनी या इमारतीच्या परिसरात थुंकू नये, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. दरम्यान, इमारतीच्या स्वच्छतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील याठिकाणी बसवा व त्यामाध्यमातून नियंत्रण ठेवा, असा सल्ला मंत्री पाटील यांनी यावेळी दिला.
चांगली वास्तू बांधण्याचा विक्रम मंगेश चव्हाण यांचा विक्रम –
मंगेश चव्हाण यांच्याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी सुंदर काम यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. कमी वेळात चांगली वास्तू बांधण्याचा विक्रम मंगेश चव्हाण यांनी केला आहे. लोकं कामाला विसरत नाही. जो काम करतो तोच प्रतिनिधी निवडून येतो. जोपर्यंत ही वास्तू राहील तोपर्यंत तुमचे नाव राहील, असेही असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. लवकरच मी पण हॉस्पिटल बांधणार असून यासाठी मंगेश चव्हाण यांचा आम्ही निश्चितच सल्ला घेऊ, असे ते म्हणाले.
हेही वाचा : Rain Update : जळगावात जिल्ह्यात पावसाची रिपरिप, काय आहे आजचा हवामान अंदाज?