जळगाव, 17 ऑगस्ट : ‘रात गयी बात गयी, पुढे चला पुढे पाहू. पुढे लोकांना आपल्याला कसा न्याय देता येईल, त्यासंदर्भात बोलू’, असे वक्तव्य राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज जळगावात केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जळगाव येथे समृद्ध खान्देश निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला माणिकराव कोकाटे उपस्थित आहेत. यावेळी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे व्यक्तव्य केलं.
नेमकं काय म्हणाले मंत्री माणिकराव कोकाटे –
मागच्या काळात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. यावर जळगावात माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, ‘रात गयी बात गयी, पुढे चला पुढे पाहू. पुढे लोकांना आपल्याला कसा न्याय देता येईल, त्यासंदर्भात बोलू. मागे काय झालं, त्याऐवजी पुढे जाण्याची आवश्यकता आहे. तसेच आपली नवीन इनिंग ही जोरदार असेल’, असेही ते यावेळी म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं –
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, त्यावेळचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहातच ऑनलाईन रमी खेळत आहे, असे व्हीडिओ समोर आले होते. त्यानंतर मंत्री कोकाटे यांच्यासह राज्य सरकारवर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीक करण्यात आली होती. तसेच कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून केली जात होती. यानंतर माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांना मंत्रिमंडळाबाहेर न काढता, त्यांचे खाते बदलण्यात आले.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आणि त्यांना क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली.
हेही वाचा – DCM Ajit Pawar Jalgaon Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात दाखल ‘असा’ आहे आजचा दौरा