मुंबई, 5 मार्च : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’, असे वक्तव्य केले होते. यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत अबू आझमी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, आज अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटलांनी ठेवला निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव –
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय, मी असा प्रस्ताव मांडतो की अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असे त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ही त्यांची वक्तव्ये आक्षेपार्ह असून त्यांची वक्तव्ये निषेधार्ह आहेत. दरम्यान, यामुळे सभागृहाचा अपमान झाला असून अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते आहे की, अबू आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे.
आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई –
छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा औरंग्या आणि त्याची भलामण करणारे अबू आझमी यांचं निलंबन दीर्घ काळासाठी करावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर केली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव सभागृहात सादर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यासाठी आमदारांचा कौल घेतला. त्यानंतर अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत. दरम्यान, अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली.
अबू आझमी यांचे वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय? –
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचा बचाव करणारे वक्तव्य केले होते. मी 17व्या शतकातील मुघल सम्राट औरंगजेबला क्रूर, अत्याचारी किंवा असहिष्णु शासक मानत नाही. आजकाल चित्रपटांच्या माध्यमातून मुघल सम्राटाची विकृत प्रतिमा निर्माण केली जात आहे. औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे आमदार अबू आझमी म्हणाले होते.
आमदार अबू आझमी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सभागृहात अबू आझमींच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.