मुंबई, 6 मार्च : रावेर या शहराला मोठ्या प्रमाणात आदिवासी पट्टा लागून असून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारे हे शहर आहे. रावेरवरून साधरणतः 70 किमी अंतरावर जळगाव आहे आणि याठिकाणी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्ता आहे. दरम्यान, रावेरमध्ये 30 खाटांचे ग्रामीण रूग्णालय असून साधरणातः 69 हजार रूग्णांची ओपीडी त्याठिकाणी मागच्या वर्षी होती. दिवसभरातून 400 ते 500 रूग्ण त्याठिकाणी येतात.
यामुळे याठिकाणी उपजिल्हा रूग्णालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी रावेर-यावल मतदारसंघाचे भाजप आमदार अमोल जावळे यांनी केली. दरम्यान, त्याठिकाणी ग्रामीण रूग्णालायऐवजी उपजिल्हा रूग्णालय जर मंजूर झाल्यास जास्तीत जास्त रूग्णांना त्याचा फायदा होईल आणि नागरिकांची मोठी अडचण दूर होईल, असेही आमदार जावळे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवर ते आज बोलत होते.
विधानसभेत आमदार अमोल जावळे काय म्हणाले? –
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस होता. दरम्यान, आज चौथ्या दिवशी पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार अमोल जावळे यांनी मतदारसंघातील विविध मुद्यांसंदर्भात महत्वाच्या मागण्या केल्या. ते म्हणाले की, माझ्या रावेर मतदारसंघात रसळपूर येथे एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, चार वर्षांपुर्वी जरी बांधकाम करण्यात आले तरी त्याठिकाणी इलेक्ट्रीक फिटिंग करण्यात आलेली नाही. फिटिंग न झाल्यामुळे ती इमारत वापरता येत नाही. यामुळे भविष्यात अशी कुठलेही प्रकल्प येऊ नयेत, अशी मी शासनाला विनंती करतो.
…तर आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी होईल मदत –
मी मध्यंतरी न्हावी तसेच पाल याठिकाणच्या ग्रामीण रूग्णालयांना अचानकपणे भेट दिली. शासनाच्या माध्यमातून चांगल्या योजना तसेच अनेक सुविधा रूग्णालयांना पुरविल्या जातात. यासोबतच खूप पैसाही खर्च केला जातो. परंतु, मी पालच्या रूग्णालयामध्ये भेट दिल्यानंतर असे लक्षात आले की, याठिकाणी शासनाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या आरोग्याचे साहित्य कार्यान्वयित नाहीयेत. किंबहुना अत्यंत वाईट अवस्थेत ते आहेत. यामुळे शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांबाबतच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवल्यास आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मदत होईल, असेही आमदार अमोल जावळे म्हणाले.
महिला सक्षमीकरण केंद्राची मागणी –
बचत गटाच्या महिलांसाठी ‘महिला सक्षमीकरण केंद्र’ कुठेही नाहीयेत. यामुळे माझ्या मतदारसंघातील यावल, रावेर आणि फैजपूर याठिकाणी महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्यात आले तर बचत गटाच्या महिला त्याठिकाणी येऊ शकतात. त्या विचारविनिमय करू शकतात. त्यांना प्रशिक्षण त्याठिकाणी देता येईल. यामुळे अशी तीन महिला सक्षमीकरण केंद्र माझ्या मतदारसंघात सुरू करण्यात यावीत, अशी मागणी रावेर-यावल मतदारसंघाचे भाजप आमदार अमोल जावळे यांनी केली.
बालसंगोपन योजनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे –
महिला व बालविकास विभागाबाबत बोलताना आमदार जावळे म्हणाले की, बालसंगोपन ही योजना अत्यंत चांगली असून बाळाचे माता किंवा पिता यांचा मृत्यू झाला तर त्या योजनेतून फायदा दिला जातो. मात्र, माझ्या तालुक्यात या योजनेंतर्गतच्या आकडेवारीचा मी आढावा घेतला असता तर त्या अधिकाऱ्यांकडे याचा कुठलाही आकडा नाहीये, असे दिसून आले. दुर्दैवाने, याचे मूल्यमापन करण्यासाठी एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला देखील याची जबाबदारी देण्यात आलेली नाहीये.
यामुळे बालसंगोपन ही योजना अत्यंत जिव्हाळ्याची योजना असून अनेक परिवारांना साथ देणारी ती योजना आहे. त्या योजनेसंदर्भातील प्रकरण यशस्वीपणे लवकरात लवकर मंजूर करून घेण्यात आली तर खूप फायदा होईल आणि जे अधिकारी यामध्ये निष्काळजीपणा करत आहेत, त्यांच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली.
हॅपिनेस लर्निंगबाबत काय म्हणाले? –
भूतानमध्ये सकल आनंद निर्देशांक (gross happiness index) मूल्यमापन केले जाते. खरंतर, संपुर्ण जगात सकल आनंद निर्देशांकाचा अवलंबनाचा प्रयत्न केला जातोय. यामुळे आपल्या राज्यात कम्युनिटीमध्ये हॅपिनेस लर्निंग जर प्रमोट करता आली तर त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून हॅपीनेस लर्निंग देता आले तर हॅपी नागरिक त्यातून तयार होऊ शकतात आणि त्यातून ते हॅपी नागरिक भविष्यात आनंद पसरवू शकतात. कारण, आपण जर आनंदी असलो तर आपल्या जगण्यावर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. यामुळे हॅपी लर्निंगबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आमदार जावळे यांनी केली.