चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 17 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात जोरदार पक्षप्रवेश सोहळे पार पडत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदे गटाने जोरदार धक्का दिला आहे. उबाठा गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.
आमश्या पाडवी शिंदे गटात –
मागील काही दिवसांपासून आमश्या पाडवी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. दरम्यान, आज मुख्यमंत्त्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर आमश्या पाडवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नंदुरबारचा विचार केला तर अजून तसा विकास झाला नाही आणि म्हणून आज मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून माझ्या सहकाऱ्यांसोबत पक्ष प्रवेश करत असल्याचे आमश्या पाडवी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले आमदार पाडवी यांचे मी स्वागत करतो. त्यांचा मुलगा, पत्नी आणि पदाधिकारी येथे आले आणि शिवसेनेत सामील झाले आहेत. पाडवी हा आमचाच माणूस आहे आणि म्हणून आम्ही जाता जाता त्याला मतदान केले होते. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडेच आहे यामुळे अनेक जण म्हणतात चुकीचे आहे. पण ज्या पक्षांकडे शिवसैनिक नाहीत ती शिवसेना कशी? खरी शिवसेना आपणच असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नंदुरबारात ठाकरे गटाला धक्का –
मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमश्या पाडवींसह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 10 महिला सरपंच, 48 पुरुष सरपंच, 2 जिल्हा परिषद सभापती, 2 उपजिल्हाप्रमुख, 4 पंचायत समिती सदस्य, एक युवासेना जिल्हाधिकारी आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेने प्रवेश केली. समावेश होता.
यांची होती उपस्थिती –
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार संजय शिरसाट, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोण आहेत आमश्या पाडवी –
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. दरम्यान, 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकींमध्ये त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, उध्दव ठाकरे गटाकडे नंदुरबारात शिवसेनेचा चेहरा नसल्याने विधानपरिषद निवडणुकीत आमश्या पाडवी यांना 2022 साली विधानपरिषदेची संधी देण्यात आली.
हेही वाचा : मुतखड्यासाठी आता जळगावात अद्यावत मशीन, रूग्णांचे हजारो रूपये वाचणार, काय आहे संपूर्ण बातमी?