मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या सरकारच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मतदारसंघातील समस्या मांडत मतदारसंघातील विकासासाठी आर्थिक तरतुदीची मागणी केली.
आमदार आमश्या पाडवी काय म्हणाले?
यावेळी विधानसभेत बोलताना ते म्हणाले की, माझ्या धडगाव-अक्कलकुवा या अतिदुर्गम मतदारसंघात तोरणमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण असलेले जे पर्यटनस्थळ आहे, जर त्याला पैशांची तरतूद केली, त्याच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करुन दिले तर आमच्या अतिदुर्गम भागात लोकांना रोजगार मिळेल.
तोरळमाण या आमच्या अतिदुर्गम भागात जे थंड हवेचे ठिकाण आहे, तिथे जर पैसे उपलब्ध करुन दिले, तर त्या भागात असलेल्या 25 ते 30 गावातील नागरिकांना रोजगार मिळेल. तसेच त्या भागात जाण्यासाठी रस्त्याचे पैसेही उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती आमदार आमश्या पाडवी यांनी यावेळी उपमुख्यमत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
अजूनही या मतदारसंघात 50 टक्क्यांपेक्षा जास्त भागात रस्ते नाहीत. कालच मी वीजेचाही विषय मांडला. आमच्या भागात वीज नाही. पाणी नाही. रस्ते नाही. म्हणून जो अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यामध्ये मी पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्याचा कुठे उल्लेखही नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की, आमच्या भागाचे रामपूर धरण, देहली धरण त्यांच्या विकासासाठीही पैसे उपलब्ध करुन द्यावे, जेणेकरुन आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळेल.
भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली, तरीही आमच्या भागातील कुपोषणची समस्या आहे. त्या भागात आरोग्याच्या या विषयावर सरकारने लक्ष दिले तर माझ्या भागाचा विकास होईल. तसेच आमची जी कुलदैवत आहे, यामोगी माता मंदिर पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी यावेळी केली.