मुंबई, 23 फेब्रुवारी : राज्याचे माजी कॅबीनेटमंत्री तथा अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना महायुती सरकारमध्ये त्यांचा मंत्रीपद मिळाले नाही. मात्र, आता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी देत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही नियुक्ती केली असून आता पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. यासोबतच माजी आमदार लहू कानडे यांची देखील वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित दादा गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेले अनिल पाटील यांनी अजित दादा गटात जाणे पसंत केले होते. यावेळी त्यांची मंत्रीमंडाळात वर्णी लागली. आपत्ती व्यवस्थापन तथा मदत पुनर्वसन मंत्रीपद त्यांना देण्यात आले होते.
दरम्यान, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल पाटील यांची दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाली असताना त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. मात्र, महायुती सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. पण, आता पक्षाकडून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच, अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे. पक्ष वाढीसाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्वास व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : ‘समाजाची गरज ओळखून पत्रकारिता करण्याची गरज’, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन