मुंबई, 6 मार्च : बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यावल तालुक्यातील साकळी गावाजवळच्या मानकी शिवारात आज दुपारी ही घटना घडली असून केशा प्रेमा बारेला असे मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करत महत्वाची मागणी केली.
बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय बालकाचा मृत्यू –
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील साकळी गावाजवळच्या मानकी शिवारातील पाटचारी जवळ केशा बारेला हा त्याच्या आईसोबत जात असताना अचानक हल्ला करत बिबट्याने मुलाला आईच्या हातातून खेचून नेले. दरम्यान, केशा बारेला यास बिबट्याने गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
विधानसभेत आमदार चंद्रकांत सोनवणेंनी मांडला मुद्दा –
राज्य विधिमंडळाचे मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून आज या अधिवेशनाचा चौथा दिवस होता. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय बालक ठार झाल्याच्या घटनेची दखल घेत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विधानसभेच्या सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी आमदार सोनवणे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात यावल तालुक्यातील साकळी शिवारात केतन सुरेश चौधरी यांच्या शेतात एक आदिवासी कुटुंब शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याच्या हल्ल्यात केशा प्रेमा बारेला या सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत बालकाच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीची केली मागणी –
दरम्यान, मृत केशा प्रेमा बारेला यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केली. तसेच बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी तसेच परिसरातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे याची दखल घेऊन शासनाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील आमदार सोनवणे यांनी केली.