मिलिंद वाणी, प्रतिनिधी
यावल, 17 एप्रिल : यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याने दोन वर्षीय बालिकेवर झडप घालत तिला ठार केल्याची घटना आज सकाळी 17 एप्रिल रोजी उघडकीस आली. दरम्यान, चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आज तात्काळ घटनास्थळी भेट मृत बालिकेच्या मेंढपाळ कुटुंबियांचे सांत्वन करत प्रशासनाला महत्वपुर्ण सूचना केल्या.
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रशासनाला सूचना –
यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिका ठार झाल्याची घटना घडली असून गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने बिबट्याचा त्वरित पिंजरे लावून बंदोबस्त करावा. तसेच बिबटे पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षीत पथकाची नेमणुक करावी, अशा सूचना आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केल्या. यावेळी त्यांनी कुटुबियांचे सांत्वन करत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेबाबत अवगत केले.
मयताच्या वारसांना मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन –
यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी सदर आपदग्रस्त कुटुंबीयांना म्हणजेच मयताच्या वारसांना तात्काळ आपण भरीव मदत उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही देत वनविभागाने त्वरित याचा प्रस्ताव तयार करावा अशी सूचना आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.
बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिका ठार –
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. 741 मध्ये मेंढपाळांचे तीन कुटुंब हे गेल्या पाच दिवसापासून वास्तवाला आहेत. दरम्यान, काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई ही दोन वर्षाच्या चिमुकली आपली आई जिजाबाई रूपनर हिच्यासोबत झोपलेली असतांना तिच्यावर झडप घातली आणि तिला उचलून केळीच्या बागेत पसार झाला. दरम्यान, कुटुंबियांनी त्या बालिकेचा शोध घेतला असता थोड्या अंतरावर तिच्या शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिका ठार; यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारातील घटना