ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 मे : जे शेत रस्ते मंजुर असतील त्या मंजुर रस्त्यांची यादी संबंधित ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी प्रांताधिकाऱ्यांकडे द्यावीत, त्या शेतरस्त्यांचे काम पुर्ण करण्याची जबाबदारी ही प्रांताधिकाऱ्यांची असेल, असे पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. शेत पाणंद रस्त्यांच्या संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, जे मजोर अधिकारी असतील त्यांच्यावर काय कारवाई करायची ही जबाबदारी माझी असणार असून त्यांची नावे माझ्याकडे लेखी स्वरूपात द्यावी त्याचा कार्यक्रम मी आठ दिवसांच्या आत लावल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त टिप्पणी देखील आमदार पाटील यांनी शेत पाणंद रस्त्यांसदर्भात मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केलीय.
पाचोरा येथील कृषीरत्न तात्यासाहेब आर.ओ.पाटील व्यापारी भवनात शेत पाणंद रस्त्याच्या संदर्भात आ.किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. दरम्यान, मंजुर झालेल्या शेत पाणंद रस्त्यांची यादी संबंधित ग्रामपंचयातींच्या सरपंच-ग्रामसेवकांनी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रत्यक्षात भेटून द्यावी. यानंतर मंजुर झालेल्या रस्त्यांचे काम पुर्ण करण्याची जबाबदारी ही प्रांताधिकाऱ्यांनी घेतली असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
आमदार किशोर आप्पा पाटील अधिकाऱ्यांवर संतापले –
शेत पाणंद रस्त्यांसदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावरून आमदार किशोर आप्पा पाटील अधिकाऱ्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. शेतपाणंद रस्ते पुर्ण न करण्यासाठी जे अधिकारी जबाबदार असतील त्यांची नावे शेतकऱ्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात द्यावीत, त्याचा कार्यक्रम मी आठ दिवसांच्या आत लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, बीडीओ तुम्ही तुमचा पदभार सोडा आणि मी भडगावचे बीडीओंना विनंती करतो की त्यांनी पाचोऱ्याचा अतिरिक्त पदभार स्विकारावा. जर तुम्ही येथे थांबलात तर प्रत्येक ग्रामसेवक हा बिझनेस करायला लागेल आणि तो नोकरीवर थांबणार नाही. यामुळे तुम्ही पदभार सोडा, अशा शब्दात आमदार पाटील यांनी पाचोऱ्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना सुनावले.
यांची होती उपस्थिती –
शेत पाणंद रस्त्याच्या संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शीतल सोनाट, पंचायत समिती गटविकास अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य मधु काटे, पदमसिंह पाटील, रावसाहेब पाटील, किशोर बारवकर, सुनिल पाटील तसेच शेतकऱ्यांची उपस्थिती होती.