चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील लासगाव या गावाने संपूर्ण जळगाव जिल्ह्याला नवीन आदर्श देण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काल केले. लासगाव येथे काल ईद व गुढीपाडवा मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
तरंग बहुउद्देशीय संस्था आणि लासगाव ग्रामस्थांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्रान देशमुख तर कार्यक्रमाची प्रस्तावना रफिक शेख तर समारोप इम्रान शेख यांनी केला. या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य पदम बापू पाटील, माजी प. स. सदस्य ललित वाघ, ज्येष्ठ पत्रकार विजय पाटील, डॉ. आलम देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युसूफ पटेल, कुरुंगी-बांबरुड जिल्हा परिषद गटातील गावातील सरपंच, पोलीस पाटील तसेच लासगावचे सरपंच समाधान पाटील, उपसरपंच वहिद देशमुख, पोलीस पाटील पंजाबसिंग पाटील तसेच लासगावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील?
सर्व हिंदू बांधवाना गुढीपाडव्याच्या तसेच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, या गावाने जिल्ह्याला नवीन आदर्श देण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वजण गेल्या अनेक वर्षांपासून कुठेही जातपात धर्म न पाहता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपण आपलं जीवन जगतोय. पण सध्या हिंदू-मुस्लिम धर्मामधील नातं कुठेतरी दुरावताना आपल्याला दिसतंय. अशा या परिस्थितीत जेव्हा कुणीतरी पुढाकार घेतं आणि पूर्ण गटातील सर्व जाती धर्माच्या, तमाम हिंदू-मुस्लिम बांधवांना एकत्र करतो, ही कौतुकाची बाब आहे.
शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्त्वाची आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. असं असतानाही हा तुमचा आमदार पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात छाती ठोकून सांगतो की, पाचोरा तालुक्यातील एकही मुस्लीम बांधवांचा बुध हा किशोर आप्पांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मायनस राहिला नाही. या मतदारसंघाचा इतिहास झाला की, 55 टक्के मुस्लिम बांधवांनी मला मतदान केलं. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही, मतदारसंघातील हिंदू आणि मुसलमान बांधवांचे संबंध दुरावणार नाही, ही माझी जबाबदारी आहे.
भांडखोर कुटूंब जीवनात कधीही प्रगतीच्या दिशेने जात नाही –
जिल्ह्यात, राज्यात, देशात काय होतंय आपल्याला या भांडणात जायचं नाही. पण माझा मतदारसंघ, माझं गाव प्रगतीच्या दिशेने कसं जाईल, हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. गावात जर एखादं भांडखोर कुटूंब असेल तर ते कुटूंब त्यांच्या जीवनात कधीही प्रगतीच्या दिशेने जात नाही. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम धर्मातील धर्मवाद आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकणार नाही. म्हणून हा आदर्श आपल्याला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात न्यायचा आहे.
मी प्रेमाने आमच्या मुस्लिम बांधवांची मनं जिंकली –
मी कधीही जात-पात धर्माचं राजकारण केलं नाही. मी 2001 मध्ये जेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलो. त्यावेळी मला एकही मुस्लिम बांधवाने मतदान केलं नाही. पण हा किशोर आप्पा चिडला नाही. त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिलं नाही. त्यावेळी खूणगाठ बांधली की माणूस हा प्रेमाने जगसुद्धा जिंकू शकतो. मी 2001 मध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण गावात पेढे वाटले. पण पेढे वाटायची सुरुवात मुस्लिम बांधवांपासून केली आणि एकदिवस मुस्लिम बांधवांची मनं जिकल्याशिवाय मी राहणार नाही, हा प्रत्येक मुस्लिम बांधव हा किशोर आप्पाला मतदान करेल, असं त्यांना सांगितलं आणि ती वेळ आज माझ्या तिसऱ्या टर्मला याठिकाणी आली. मी प्रेमाने आमच्या मुस्लिम बांधवांची मनं जिंकली आणि नुसती जिंकली नाही तर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या इतिहासात अशी गोष्ट कधी घडली नाही. एकतरी तिसऱ्यांदा कुणी निवडून आलं नाही आणि त्यातल्या त्यात 40 हजारांचं मताधिक्य तर कुणालाच मिळालं नाही. मी कधीही भेदभाव केला नाही त्यामुळे मला इतक्या मोठ्या मताधिक्याने मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी निवडून दिलं.
पाचोरा शहरात मुस्लिम बांधवांच्या कबरस्तानाची अवस्था वाईट होती. त्यामुळे हिंदूंच्या स्मशानभूमीला लागून 2 एकर जागा मुस्लिम बांधवांच्या कबरस्तानसाठी दिली. त्याचा ठराव केला. आणि पाचोरा-भडगाव मतदारसंघात ज्या-ज्या ठिकाणी आमचा मुस्लिम बांधव राहत असेल, त्याठिकाणी कबरस्तानला वॉल कम्पाऊंड बांधण्याचं काम केलं.
15 वर्षांपासून पाचोऱ्यात एकही दंगलीचा गुन्हा नाही –
फक्त किशोर आप्पा गोड बोलतो म्हणून मुस्लिम बांधवांनी मते दिली नाही. 20 वर्षांपू्र्वी हिंदू आणि मुस्लिम बांधवांची दंगल झाली. लोकं घरात घुसतात. पण मी दंगलीत उतरलो. दोघांना हात जोडले आणि हात जोडून हिंदूंना घरात घातले. मुस्लिमांना घरात घातले. आज 15 वर्षे झाली पाचोऱ्यात एकही दंगलीचा गुन्हा पाहायला मिळाला नाही. प्रेमाने जग जिंकू शकतो आज ती परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे. म्हणूनच आज आपण विकासाच्या दिशेने जात आहे, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यावेळी म्हणाले.
मागच्या 10-15 वर्षांपूर्वी 2-4 किलोमीटरपर्यंत एकही हिरवं शेत आपल्याला दिसत नव्हतं आणि आता रब्बीची मक्का आणि ज्वारी घरात ठेवायला जागा नाही, इतकं आपलं उत्पन्न येतंय. याचं कारण तुमच्या शेतातून निघणारा प्रत्येक पाण्याचा थेंब आम्ही अडवला आणि ज्या विहिरींना पाणी नव्हती ती विहीर आता 12-12 तास चालू लागली. आता एकही कोरडं शेत पाहायला मिळत नाही. आम्ही पाण्याचं, विजेचं, रस्त्यांचं नियोजन केलं.
आज शेतरस्त्याची मागणी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एकही शेतरस्ता दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत. पाचोरा भडगाव मतदारसंघात लासगाव आणखी भाग्यवान आहे. कारण सर्वात आधी सोलर प्रकल्प लासगावला चालू झाला, असे म्हणत आगामी काळात हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत एका नव्या उंचीवर घेऊन जाणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यावेळी म्हणाले.