चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 14 जून : जळगाव जिल्हाबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज वाटप करता येणार नसल्याचा हा जिल्हा बँकेचा निर्णय मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मागे घ्यायला लावला असल्याचे पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, आज पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अमोल शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले आमदार किशोर पाटील? –
आमदार किशोर पाटील पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हणाले की, जळगाव जिल्ह्याच्या क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येत नाही. असे जर करायचे असेल तर विभागीय उपनिबंधकांची परवानगी लागते. दरम्यान, आम्ही यांसंदर्भातील मुद्दा जिल्हा बँकेत मांडला असता त्यानुसार जिल्हा बँकेने निबंधकांकडे कर्जवाटपासंदर्भातील परवानगी मागितली होती. दरम्यान, विभागीय सहनिबंधकांनी 22 मे रोजी यांसंदर्भातील सूचना करत जिल्ह्या बाहेरील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्यामार्फत अशा पद्धतीने कर्जवाटप करता येणार नाही आणि केल्यास तर ते कायद्याचे उल्लंघन होईल. तसेच याला जिल्हा बँक आणि त्यांचे कार्यकारी संचालक जबाबदार असतील, असा खुलासा केला होता.
अमोल शिंदे आणि वैशाली सुर्यवंशी यांच्या शिक्षण संस्थेत गैरव्यवहार? –
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निर्णयावरून आमदार किशोर पाटील यांना शेतकऱ्यांचा कळवळा नसल्याची टीका अमोल शिंदे यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना किशोर पाटील यांनी म्हणाले की, अमोल शिंदे आणि वैशाली सुर्यवंशी यांची खोटं बोलायचं आणि रेटून बोलयचं, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांच पाहायचं वाकून अशी परिस्थिती आहे. दरम्यान, शालेय शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा गणवेश, गाडी भाडे, शालेय फी यांच्यातून पालकांची लूट होत असल्याचा आरोप आमदार किशोर पाटील यांनी वैशाली सुर्यवंशी आणि अमोल शिंदे यांच्यावर केला.
आचारसंहितेनंतर शेतकऱ्यांना मिळणार भरपाई –
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कांदा, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रूपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले असून आचारसंहिता मागे होताच शंभर टक्के संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची भरपाई मिळेल, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.
हेही वाचा : “अमोल शिंदे यांनी स्मिता वाघ यांच्याविरोधात काम केले”, आमदार किशोर पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट