चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 14 जून : “स्मिता वाघ यांना पाचोरा-भडगाव मतदारसंघातून एकीकडे माझ्यासह माझ्या शिवसैनिकांनी तब्बल 16 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले. तर दुसरीकडे अमोल शिंदे आणि त्यांच्या सर्व कंपनीने जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्याविरोधात काम केले,” असा गौप्यस्फोट आमदार किशोर पाटील यांनी केला. पाचोऱ्यात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उन्मेश पाटील आणि अमोल शिंदे तसेच करण पाटील आणि अमोल शिंदे ह्या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका त्यांनी शिंदे यांच्यावर केली.
अमोल शिंदे मातोश्रीच्या मागच्या दरवाजाने पळून आले –
आमदार किशोर पाटील पत्रकारांसोबत संवाद साधताना पुढे म्हणाले की, “ज्यावेळी उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी अमोल शिंदे हे देखील मातोश्रीवर गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी वैशाली सुर्यवंशी यांना आधीच तिकिट दिले गेले असल्याने तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी मिळणार नाही, असे अमोल शिंदे यांना सांगितले. यानंतर ते थेट मातोश्रीच्या मागच्या दरवाजाने पळून आले, असा खोचक टोला आमदार पाटील यांनी अमोल शिंदे यांच्यावर लगावला.
अमोल शिंदे यांचा ‘तो’ व्हिडिओ होता खोटा –
आमदार किशोर पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, ज्यावेळी अमोल शिंदे ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी शिंदे यांनी मी ठाकरे गटात प्रवेश करत नसून इंदोरमध्ये आहे, असे सांगत एक व्हिडिओ प्रसारित केला. मात्र, अमोल शिंदे यांचा तो व्हिडिओ खोटा होता. मातोश्रीच्या बाहेरून गाडीत बसून तो व्हिडिओ शूट केला असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : Smita Wagh Special Interview : आपल्या मुलांसाठी मतदारसंघाला कर्मभूमी बनवणार – खासदार स्मिता वाघ