चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 13 जुलै: पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील वीज ग्राहक व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या तक्रारी मांडत वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटींचा पाढाच वाचला. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थित नागरिकांच्या समस्या स्वतः ऐकून घेत त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
बैठकीदरम्यान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना मागील दहा ते बारा वर्षांत मतदारसंघातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. वीज पुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत व्हावा यासाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, एवढे प्रयत्न करूनही आजही सर्वसामान्य वीज ग्राहक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर महावितरणच्या कारभाराबाबत तक्रारी करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याबद्दलही आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. जनतेच्या समस्या वेळेत न सोडवल्यामुळे नागरिकांचा रोष वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाचोरा येथे नव्याने रुजू झालेले महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांच्याकडेही विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. मतदारसंघातील प्रत्येक भागातील वीज वितरण व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून स्थानिक समस्या समजून घ्याव्यात तसेच नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ग्रामोपाध्ये यांच्याकडून व्यक्त केली. आगामी काळात तक्रार निवारण प्रक्रियेला गती देत नागरिकांना समाधानकारक सेवा मिळावी, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पाचोरा-भडगावातील आढावा बैठकीत प्रश्नांचा भडिमार –
बैठकीत नागरिकांनी महावितरणविरोधात अनेक गंभीर समस्या मांडल्या. अनेक ठिकाणी वीजेच्या तारा खाली लोंबकळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली. काही भागांत सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असून त्यानंतर वीज बिलात अनावश्यक वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, विशेषतः पावसाळ्यात तासन्तास वीज नसणे, शेतीच्या महत्त्वाच्या कामांच्या काळात वीजपुरवठा बंद राहणे, शेतकऱ्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या अर्जांवर कार्यवाही न होणे, वीज तारांमुळे उसासह पिकांचे नुकसान होऊनही भरपाई न मिळणे, तसेच नवीन वीज खांब उभारणीच्या कामांना होणारा विलंब अशा अनेक प्रश्नांवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आमदारांचे महावितरणच्या अधिकारी-कर्माचाऱ्यांना महत्वाचे निर्देश –
बैठकीच्या शेवटी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन त्यावर वेळबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज सेवेसंदर्भात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती –
बैठकीस प्रांताधिकारी भूषण अहिरे, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, भडगाव गटविकास अधिकारी के. बी. अंजने, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, नगरसेवक सुमित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, पद्मसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, शिवसेनेच्या डॉ. अस्मिता पाटील, यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि पाचोरा-भडगाव तालुक्यातील तक्रारदार नागरिक उपस्थित होते.






