चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 3 जानेवारी : राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती आणि सावित्रीबाई फुले जयंती तसेच महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून महिला बचत गटाच्या महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर व सुनिताताई किशोर पाटील यांचा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ पाचोरा शहरातील मानसिंगका मैदानावर आज 3 जानेवारी रोजी दुपारी पार पडला.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक/नगरसेविक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याने पाचोरा वासियांचे आभार मानले. यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांसाठी सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून ऊर्जा दीदी ही संकल्पना राबविणार असल्याचे सांगितले.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, गेल्या चार-पाच वर्षांपासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ठिकठिकाणी महिलांसाठी मेळावे घेतले आणि बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले. तसेच पालकमंत्र्यांच्या मदतीने दीड कोटीच्या निधीतून बहिणाबाई मार्टच्या माध्यमातून उद्योगनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, महिलांना कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतरही पापड-कुरडई तयार करण्यासारखे छोटे-छोटे उद्योग केले जात असून यापलीकडे महिला बघिनी जाऊ शकल्या नाहीत. अर्थात हे वाईट आहे, असे मी अजिबात म्हणत नाही. परंतु, त्याहून अधिकच्या रोजगार निर्मितीसाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी प्रति महिन्याला त्यांना 10 ते 20 हजार रूपये कमवता येतील का यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.
‘ऊर्जा दिदी’ या संकल्पनेतून महिलांसाठी रोजगार निर्मिती –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, कदाचित आज ते अवघड वाटत असेल. पण, एक दिवस असा येईल की योजना 100 टक्के पुर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही. पाचोरा आणि भडगाव शहरात ऐतिहासिक मताधिक्य महिला बघिनींनी आम्हाला मिळवून दिलंय. यामुळे आमची देखील जबाबदारी वाढली असून सोलर प्रकल्पाच्या ‘ऊर्जा दिदी’ या संकल्पनेच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मिती केली जाणार आहे.
‘ऊर्जा दीदी’ नाव का दिले?’ –
जर आमची महिला बघिनी ही सीमेवर जाऊन रायफल घेऊन देशाचे संरक्षण करू शकते तर स्वतःला दोन पैसे मिळावेत म्हणून आमची महिला बघिनी छतावर का चढू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. पण या प्रश्नाचे उत्तर मीच मला दिलं आणि होय ही माझी दीदी हे केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या संकल्पनेला ‘ऊर्जा दीदी’ असे नाव दिले. खरंतर, लाईटच्या माध्यमातून प्रकाश तर मिळेलच पण उर्जा द्यायचीच असेल तर ऊर्जा दीदीच्या माध्यमातून आम्हाला हे काम करावं लागेल, असेही आमदार पाटील म्हणाले.
‘आजच्या काळात सोलरची गरज’ –
आजच्या स्थितीत बळजबरीने स्मार्ट मीटर बसवून ज्या ठिकाणी 500 रूपये वीजबील यायचे त्याठिकाणी 3 हजार रूपये बील आकारले जात आहे. पण येत्या काळात स्मार्ट मीटर बसवणे सक्तीचे होणार आहे. असे असताना लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रूपये जर वीजेचे बील भरण्यात जात असतील तर नेमकं काय करावं, असा प्रश्न निर्माण झालाय. म्हणून आता सोलरची गरज निर्माण झाल्याचे आमदार पाटील म्हणाले.
बचत गटाच्या महिलांना काय कराव लागणार? –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, बचत गटाच्या महिलांनी ‘ऊर्जा दीदी’ संकल्पनेच्या माध्यमातून सोलर प्रकल्प योजनेत सहभागी घ्यायचाय. यामध्ये महिलांना प्रत्येक घरी जाऊन सदर घरात विजेची वापरली जाणारी उपकरणे याची माहिती घेऊन याचे सर्वेक्षण करायचंय. यानंतर सोलरचे महत्व पटवून दिले पाहिजे.
छतावर 3 किलो व्हॅटच्या सोलरसाठी 2 लाख रूपये खर्च येणार असून 2 लाख रूपये कर्ज बँकेच्या माध्यमातून दिले जाईल. यामध्ये 70 हजार रूपये अनुदान शासनाच्यावतीने दिले जाणार आहे. यामधून 25 हजार रूपयांचा लाभ सोलर कंपनींना होऊ शकतो. यापैकी 10 हजार संबंधित कंपनीने ठेवले आणि उरलेले 15 हजार रूपये महिला बचत गटातील महिलांना मिळू शकतात. यासोबत परिवारातील सदस्यांकडून देखील काम करून घेतले तर त्यांना देखील रोजगार मिळेल.
दरम्यान, आगामी काळात प्रभाग, गट आणि गणनिहाय महिला बचत गटाच्या महिलांसाठी संबंधित सोलर कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिर राबवले जाईल आणि महिल सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न व्यापक स्वरूपात केले जाणार असल्याचे आमदा किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ठ केले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बचत गटांना नेहमीच पाठबळ दिलंय – अॅड. दीपक बोरसे
सोलर प्रकल्प योजबाबत अॅड. दीपक बोरसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्या स्वप्नातले शहर म्हणून पाचोरा-भडगावचा विकास करण्याचा प्रयत्न केलाय. यासोबतच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी बचत गटांना नेहमीच पाठबळ दिलंय. सोलराईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून महिलांसाठी नाविन्यपुर्ण करण्यासाठी आमदार पाटील यांनी विचारणा केली.
दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील आणि आमच्या संपुर्ण टीमच्या संकल्पनेने महिलांना सौर उर्जा क्षेत्रात आणून स्त्रीला थेट उद्योजक बनवण्याचा आमचा उद्देश आहे. महिलांना सौर ऊर्जा क्षेत्रात आणण्याचा हा जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्र तसेच देशातला पहिलाच प्रयत्न राहणार असल्याचा मानस अॅड. दीपक बोरसे यांनी व्यक्त केला. यानंतर सोलराईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहकाऱ्यांनी उपस्थित महिलांना सोलर प्रकल्पाच्या ऊर्जा दीदी संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा : Video | ‘पाचोऱ्यात पाण्याची योजना आणण्यासाठी प्राधान्य’; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन






