चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 27 जानेवारी : पाचोऱ्यात मागील पाच वर्षात तीन बोगस कंपन्यांनी 100 ते 200 कोटींहून अधिक रूपयांची फसवणूक करून निघून गेल्या. असे असताना संबंधित भागात एखादी कंपनी येते, करोडो रूपयांची फसवणूक करून जाते आणि कोणीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी येतं, तोपर्यंत पोलीस स्टेशन काय करतं, असा संतप्त सवाल पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला आहे. तसेच पाचोऱ्यातील अशा आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थित केला आर्थिक फसवणुकीचा मुद्दा –
जळगाव जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आयेजित करण्यात आली. या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यातील आर्थिक फसवणुकीबाबत मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, पाचोऱ्यात मागील पाच वर्षांत गुंतवणुकीसंदर्भातील तीन फ्रॉड कंपन्यांनी 100 ते 200 कोटी रूपयांची फसवणूक केली. अशातच या कंपन्यांविरोधात कोणीही तक्रार दाखल करायला गेले नाही. आता ज्याप्रमाणे बांगलादेशी नागरिक आपल्या भारतात राहत असल्यानंतर त्यांचे आधारकार्ड तपासण्यात येत आहे. तसेच आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत एखादी बोगस कंपनी येते आणि करोडो रुपयांची फसवणूक करून निघून जाते. ज्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशावेळी संबंधित व्यक्ती देखील गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी समोर येत नाही. मात्र, संबंधित भागात एखादी कंपनी येते आणि करोडो रुपयांची फसवणूक करून जाते, तोपर्यंत पोलीस विभाग काय करतं?, असा संतप्त सवाल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला आहे. तसेच पाचोऱ्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून शेकडो रूपयांची फसवणूक झाली असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
पाचोऱ्यात 200 कोटींची फसवणूक –
आमदार पाटील पुढे म्हणाले की, राहुल माळी या व्यक्तीकडे केवळ पाचोरा शहरातील नागरिकांनी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, तो राहुल माळी आता फरार आहे. आता तो नाशिकला आहे. तसेच नागरिकांकडे काही पुरावा नसल्याने कोणीही गुन्हा दाखल करायला तयार नाही. अशा कंपन्या करोडो रूपयांच्या फसवणूक करतात, तोपर्यंत पोलीस स्टेशन काय करते. जसे आपण एखादा भाडेकरू आला तर त्याप्रमाणे त्याचे अॅग्रीमेंट करून पोलिसांना कळवायला लावतो. त्याप्रमाणे पोलिसांनी एखादी कंपनी गुंतवणुकीसाठी येत असेल तर त्यांच्या सर्व माहिती घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आर्थिक फसवणुकीसंदर्भातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मुद्याची दखल घेतली. पाचोऱ्यातील आर्थिक फसवणूक प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून योग्य ती चौकशी करू, असे यावेळी डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार स्मिता वाघ, आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त, जिप मुख्याधिकारी तसेच शासनाच्या विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : pachora crime news : धक्कादायक, पाचोरा तालुक्यातील तरुणाकडे आढळले 2 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस