ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 11 मार्च : गेल्या वर्षी सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचानामे प्रशासनाकडून करण्यात आले होते. दरम्यान, या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून अनुदान मंजूर झाले असून ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून (तलाठी) सदर शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यास त्यांनी त्वरित आपले सरकार केंद्रात जाऊन ई-केवायसी करावी, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. पाचोऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर पाटील, भाजपचे माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, आदी उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार असून याबाबतची माहिती देण्यासाठी ‘शिवालय’ शिवसेना कार्यालय तथा आमदार किशोर आप्पा पाटील यांचे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी परतीच्या पावसाने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यावेळी कापसाचे पीक हाताशी आले असताना पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेला होता. त्यांनंतर तातडीने पंचनाम्यांचे काम सुरू राहिले आणि त्यांनंतर नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता.
सुदैवाने जळगाव जिल्ह्याचेच अनिल पाटील हे मुदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री असल्याने त्यांना मी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकाऱ्यांना तात्काळ पंचानामे करण्याचे सूचना दिल्या आणि अवघ्या चार ते पाच महिन्यांच्या कालवधीत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे होणारे नुकसान आपण थांबवू शकत नाही. पण झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळावा, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवत तात्काळ पंचनामे करून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने निश्चितपणे चांगल्या पद्धतीची फलश्रूती आपल्याला पाहायला मिळते, असेही आमदार पाटील म्हणाले.
पाचोरा-भडगावमध्ये नुकसान भरपाईची रक्कम किती? –
पाचोरा-भडगावमध्ये झालेल्या नुकसानीबाबत माहिती देताना आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील 51066.78 क्षेत्र बाधित झाले होते. यामध्ये 52 हजार 364 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असता 69 कोटी 45 लाख 22 हजार रूपये अनुदान त्यासाठी प्राप्त झाले आहे. यासोबतच भडगाव तालुक्यात 22100.15 हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले होते. यामध्ये 34 हजार 369 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले 30 कोटी 05 लाख 62 हजार रूपये अनुदान मंजुर झाल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
किशोर आप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन –
दरम्यान, सदर अनुदान DBT पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) लाभार्थ्यां यांचेकडून बँकनिहाय/आधार क्रमांक निहाय यादी बनवण्याचे कामकाज सुरु आहे. तरी याव्दारे सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्याला विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यास त्वरीत आपले सरकार केंद्रात जावून ई-केवायसी करावी व सदरची रक्कम आपल्या खात्यात DBT पोर्टलमार्फत प्राप्त होईल. असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
हेही वाचा : लासगाव सोलर प्रकल्पावरून शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा, नेमकी बातमी काय?