ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 जून : राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील 1860 जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ काल 16 जून रोजी मोठ्या उत्साहात झाला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रवेश केला. यावेळी आमदार पाटील विद्यार्थ्यांसोबत रमल्याचे पाहायला मिळाले.
नवीन इयत्तेत जाणाऱ्या तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये खासदार-आमदार, तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने त्यांच्यासोबत संवाद साधला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा – भडगांव मतदारसंघातील विविध गावातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
आमदार रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत –
पाचोरा तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश व उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांची घोडागाडीतून संपूर्ण गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी त्या विद्यार्थ्यांच औक्षण करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, आमदारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील हे विद्यार्थांसोबत रमल्याचे पाहायला मिळाले.
View this post on Instagram
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकी संघ संचालक वसंत पाटील, माजी नगरसेवक संतोष भाऊ, माजी नगरसेवक जगू दादा, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, शिवसेना शहरप्रमुख बबलू देवरे तसेच गटशिक्षण अधिकारी समाधान पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, केंद्रप्रमुख चंद्रकांत मोराणकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भिकन अहिरे, शिक्षक साहेबराव चौधरी, पंकज चित्ते, अनिता जाधव, शिवदास देवरे, गावातील विद्यार्थ-पालक उपस्थित होते.
हेही वाचा : Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ