ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 सप्टेंबर : पाचोरा शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्ते कामांबाबत अनेक तक्रारी येत होत्या. दरम्यान, रस्ता काँक्रेटीकरणाच्या कामासाठी 104 करोड रूपयांचा डीपीआर अर्थात डीटीएल प्रोजेक्ट रिपोर्ट मंजूर झाला असून यासाठीचे टेंडर प्रक्रिया पार पडली आहे. या कामाचे कंत्राट हे एमएसपी बिल्डकॉन प्रा.लि. या कंपनीला देण्यात आल्याची माहिती पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी दिली.
शिवालय या त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, पाचोरा शहरातील रस्त्यांचे प्रश्न पुढील 25 वर्षांसाठी मिटणार असून विरोधकांना आता भविष्यातील 25 वर्ष मुरूमचे ट्रॅक्टर टाकण्याची वेळ येणार नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. खरंतर, ही वस्तूस्थिती होती की रेल्वेलाईन पलीकडचे अर्थात भडगाव रोड परिसरातील रस्ते खराब झाले होते. यावरूनच या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, रस्ता काँक्रेटीकरणाच्या कामासाठी 104 करोड रूपये मंजूर झाले असून येत्या दोन दिवसात या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
ओपन स्पेसच्या कामांसाठी 15 करोड रूपयांचा निधी मंजूर –
पाचोरा शहरात ओपन स्पेस विकसित करण्याचा प्रयत्न केला. यासाठी सरासरी एका ओपन स्पेससाठी 10-15 लाख रूपयांची मागणी करण्यात आली. यापैकी मागच्या काळात ओपन स्पेससाठी 15-20 कोटी रूपये प्राप्त झाले. यामध्ये ज्या ठिकाणी छोटी ओपन स्पेस असेल त्याठिकाणचे काम पुर्ण झालेत. मात्र, 10 ते 15 लाख रूपयांत ज्याठिकाणी 20 ते 25 हजार स्क्वेअर फुटची मोठे ओपन स्पेस असेल तर ते काम पुर्णत्वास आले नाही. दरम्यान, आता जेवढेही मोठे ओपन स्पेस होते, त्यांच्या राहिलेल्या कामासाठी 15 करोड रूपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केले असून उद्यापर्यंत याबाबतचा जीआर प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
अडीच कोटी रूपयांचा पूल मंजूर –
पाचोरा शहरात असलेल्या राम मंदिरात चौघं बाजूने कशा पद्धतीने जाता येईल, यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, आता राम मंदिरात जाण्यासाठी जैनपाठ शाळेच्या जागेतून अडीच करोड रूपयांचा पूल मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जैनपाठ शाळेतून मानसिंगाच्या ग्राऊंडवरून थेट प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी एका मिनिटात पोहचता येण्यासाठी त्याठिकाणी व्यवस्था केली जाणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.